Breaking News

ज्ञानाची शिदोरी पोहचवा घरोघरी ..! उपक्रमास कला-वाणिज्य महाविद्यालयात प्रारंभ

सातारा, दि. 21 (प्रतिनिधी) : प्रत्येकाच्या घरी वाचून झाल्यानंतर असणारी पुस्तके ही दान रुपाने गोळा करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात ज्ञानाची शिदोरी पोहचावा घरोघरी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. 
प्रत्येक व्यक्तीच्या घरी काही ग्रंथ, पुस्तके असतात. वाचल्यानंतर बहुतेकवेळा ती पुस्तके तशीच पडून राहतात. काही वेळेला या पुस्तकांना रद्दीचे दुकान गाठावे लागते. समाजामध्ये आजही कित्येक असे विद्यार्थी आहेत, त्यांना पुस्तके नवीन विकत घेता येत नाहीत. त्याचबरोबर वाचनाची आवड असतांनाही पुस्तके उपलब्ध होत नाहीत. याचा समन्वय साधून अडगळीत पडून राहणारी पुस्तके योग्य वाचकाच्या हातात देण्याचा उद्देश ठेवून कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी ज्ञानाची शिदोरी पोहचावा घरोघरी हा उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. या उपक्रमासाठी विविध दात्यांनी हजारहून अधिक पुस्तके दान केली.
प्रमुख पाहुणे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते आणि डॉ. गिरीश पेंढारकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला सरस्वती प्रतिमेला आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देताना
सातपुते म्हणाले, बर्‍याचवेळा वाचनासाठी आपण पुस्तके विकत घेतो. त्याचबरोबर मित्र परिवाराकडून भेट म्हणून येत असतात. अशी पुस्तके वाचनानंतर अन्य वाचकांपर्यंत पोहचावीत, हा उद्देश ठेवून हा उपक्रम सुरु करण्यात आला. हे अक्षराचे लेणं या उपक्रमाच्या माध्यमातून निश्‍चितपणे गरजवंताला देणं होईल. हा स्तुत्य उपक्रम इतरांसाठी मार्गदर्शक आहे.
हा उपक्रम वर्षभर सुरु राहणार आहे. या उपक्रमात प्रत्येकाने सहभागी होऊन पुस्तके दान करावीत, असे आवाहन प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. निवृत्त ग्रंथपाल एल. ए. पाटील यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल पी. बी. वाकडे यांनी केले, प्रा. उदय लोखंडे यांनी आभार मानले.