Breaking News

पत्रकार सचिन लहाने यांना विभागीय पुरस्कार प्रदान

बुलडाणा, दि. 12 - महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम यशस्वी करण्यासाठी व्यापक जनजागृतीपर लिखाण केल्याबद्दल शासनाच्या वतीने दिला जाणारा 1 लाख रुपयांचा अमरावती विभागीय प्रथम पुरस्कार उपसंपादक सचिन लहाने यांना अप्पर पोलिस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 10 मार्च 2017 रोजी प्रदान करण्यात आला. 
तंटामुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्याकरिता सन 2014-15 या वर्षात सचिन लहाने यांनी उत्कृष्ट लिखाण करून मोहिमेची गावपातळीवर महती पटवून दिली. या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने पत्रकारांना दिला जाणारा अमरावती विभागीय प्रथम पुरस्कार लहाने यांना जाहीर केला. या पुरस्काराचे वितरण पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुंबईच्या अप्पर पोलीस महासंचालक प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी 1 लाख रुपयांचा धनादेश, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन लहाने यांचा सरवदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पत्रकार पृथ्वीराज चव्हाण यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (रक्कम 25 हजार) आणि संजय निकस यांना जिल्हास्तरीय द्वितीय पुरस्कार (रक्कम 15 हजार) प्रज्ञा सरवदे यांच्या हस्ते प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अप्पर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडकर यांनी केले. या सोहळ्याला संजयकुमार बाविस्कर यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, श्‍वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सोळंके, रुपाली दरेकर, अमोल गायकवाड, रामेश्‍वर वेंजने, डीवायएसपी (गृह) रुपेश बोबडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाणेदार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.