Breaking News

एकोपा वाढून गावे जलसमृध्दीच्या दिशेने वाटचाल : जिल्हाधिकारी


सातारा दि. 23 (प्रतिनिधी) : पाण्यावरुन अनेक गावात भांडणे होत होती. काही गावे तर भांडण-तंट्यात प्रसिध्द होती. परंतू जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावात एकोपा वाढून ही गावे आज जलसमृध्दीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे खूप मोठे यश या अभियानाचे आहे, असे गौरवोदगार जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी काढले.
जागतिक जलदिनाच्या निमित्ताने येथील नियोजन भवनमध्ये जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी मुद्गल बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो संजय पाटील, कराड प्रांताधिकारी किशोर पवार, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले, वरिष्ठ भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण अधिकारी विलास भोसले, कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, उपप्रकल्प व्यवस्थापक अविनाश मोरे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जल प्रतिज्ञा घेण्यात आली. लोक सहभागाशिवाय शासनाची कोणतीही योजना पूर्ण होत नाही, असे सांगून मुद्गल  म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला, यामुळेच जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्याचा परिणाम तात्काळ पहायला मिळत आहे. पाणी बचतीची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरु केली पाहिजे. पाण्याची काटकसर तर काळाची गरजच आहे. पुढच्या पिढीसाठी पाणी साठवून ठेवण्याचे तंत्र महत्वाचे आहे. त्यासाठी सुजलाम् सुफलाम् महाराष्ट्र भावी पिढीसाठी टिकवून ठेवू. आज आपण जल प्रतिज्ञा घेतली. ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरवा. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निर्माण झालेला पाणी बचतीचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचवा, असे आवाहन मुद्गल यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, कोरेगाव तालुक्यातील वेळू गावचे ग्रामस्थ शरद भोसले, कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळावलेल्या वेळूचे सरपंच पुनम भोसले आणि ग्रामस्थ, प्रचार प्रसिध्दी योगदान देणारे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, अभियानामध्ये योगदान देणारे प्रांताधिकारी किशोर पवार, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, कार्यकारी अभियंता प्रकाश भोसले, वरिष्ठ भू वैज्ञानिक व भूजल सर्व्हेक्षण अधिकारी विलास भोसले, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता राजकुमार साठे, कृषी सहायक सूर्यकांत भोईटे, सुजीत शिंदे, कृषी पर्यवेक्षक अजित जगताप, मंडल कृषी अधिकारी अनिल महामुलकर, उत्कृष्ठ योगदानाबाबत किवळचे माजी सरपंच कल्पना साळुंखे व सरपंच उषा साळुंखे, भंडारमाचीचे सरपंच कुसुम मदने, अनपटवाडीचे सरपंच मनोज अनपट, विसापूरचे सरपंच सागर साळुंखे, सोनापूरचे सरपंच पुष्पा गायकवाड, चांदक-गुळुंबचे सरपंच अल्पना यादव, गिरवीचे सरपंच प्रकाश निकाळजे, इंजबाव सरंपच व ग्रामस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उपप्रकल्प व्यवस्थापक अविनाश मोरे यांनी सर्वांचे आभार मानले.