Breaking News

कर्जमाफीसाठी खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

सातारा, दि. 23 (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवनात विरोधक आक्रमक झाले असताना इकडे सातार्‍यात एका शेतकर्‍याने कर्जमाफीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजखांबावर चढून आत्महत्येचा इशारा दिला. याप्रकारामुळे अधिकार्‍यांची चांगलीच तारांबळ उडाली.
शेतकर्‍यांचे कर्ज माफ करावे, बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी हा शेतकरी सातार्‍याच्या जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन करत होता. आपल्या मागण्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा शेतकरी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ध्वजखांबावर हातात रॉकेलची बाटली घेवून चढला आणि त्याने आत्मदहनाचा इशारा दिला.
सर्वजण स्वार्थी आहेत शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा, बैलगाडी शर्यत पुन्हा चालू करा, जिवाचे बरे वाईट झाले तरी राष्ट्रध्वजाला ठेच लागू देणार नाही. अशी घोषणाबाजी करत त्याने आत्मदहनाचा इशारा दिला. त्यावेळी त्या शेतकर्‍याला खाली उतरवताना प्रशासकीय अधिकार्‍यांची दमछाक झाली.