पाण्याची बचत म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची बचत - जिल्हाधिकारी
जलजागृती सप्ताहाचा समारोप
बुलडाणा, दि. 23 - पावसाची अनियमितता, अनिर्बंध होणारा पाण्याचा उपसा, दरडोई वाढलेला पाण्याचा वापर यामुळे पाणी हा काटकसरीचा विषय बनला आहे. आज पाण्याची बचत म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची बचत बनली आहे. पाण्याचा जेवढा उपयोग आपण करतो, त्यापेक्षा जास्त पाण्याची बचत करायला शिकले पाहिजे. अन्यथा मानवी जिवन बरबाद करण्यास आपणच जबाबदार असू. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून हे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज व्यक्त केली.जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आज बुलडाणा रेसीडेन्सी क्लब हॉटेलच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुनील चौधरी, कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील, माधवराव मारशेटवार आदी उपस्थित होते.
पाण्याची बचत ही काळाची गरज असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, पाणी बचतीचा मंत्र सर्वांनी ध्यानी धरला पाहिजे. शालेय जीवनापासूनच पाण्याच्या बचतीचे महत्व सांगितले पाहिजे. विद्यार्थी दशेपासून पाणी बचतीचा संस्कार रूजल्यास भावी आयुष्यात पाण्याचे महत्व सांगण्याची आवश्यकता भासणार नाही. जलसंपदा विभागाने राबविलेल्या या जलजागृती सप्ताहामुळे जिल्हाभर पाणी बचतीचे महत्व कळाले आहे. या विभागाने जिल्हाभर हा सप्ताह साजरा करून जलजागृती केली आहे. समाजाच्या सर्व स्तरातून जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यास भविष्यातील पाणी टंचाईसारख्या परिस्थितीवर मात करता येणे शक्य होणार आहे.
अध्यक्षीय विचार मांडताना अधिक्षक अभियंता सुनील चौधरी म्हणाले, जलसंपदा विभागाचा मुख्य संपर्क हा धरणाच्या लाभक्षेत्रात येणारे लाभधारक, भूधारक यांच्याशी येतो. हा शेतकरी किंवा भूधारक जेव्हा त्यागाची भावना ठेवतो. त्यातूनच जलसंपदा विभागाला काम करण्याची संधी मिळते व मोठे, मध्यम, लघू प्रकल्प आकारास येतात. जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादीत न राहता नागरिकांनी सतत पाण्याबाबत जागरूक असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जलप्रतिज्ञेचे वाचन याप्रसंगी कार्यकारी अभियंता श्रीराम हजारे यांनी केले.
यावेळी माधव मारशेटवार यांचा जलप्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. रामकृष्ण पाटील यांनीही पाण्याचे महत्व सांगितले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी यांनी जलजागृतीपर चित्रप्रदर्शनीची पाहणी केली. यावेळी अंध मुला-मुलींच्या चैतन्य चमूने जलजागृतीपर गीत सादर केले. कार्यक्रमादरम्यान जलजागृती सप्ताहामध्ये राबविलेल्या उपक्रमांवर आधारीत माहितीपट सादर करण्यात आला. कार्यक्रमाला कार्यकारी अभियंता हेमंत सोळगे, संजय जेवळीकर, महादेव कदम, रोहीत जगताप, चंद्रकांत साळुंखे, के.बी उमाळे आदी उपस्थित होते. संचलन ज्योती नलावडे व वैशाली रोकडे यांनी, तर आभार प्रदर्शन उपअभियंता एकनाथ हिरडकर यांनी केले.
