Breaking News

इनरव्हील व्हीनसचा हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट प्रेरणादायी

। डॉ. गौरी बोरकर यांचे प्रतिपादन   
अहमदनगर, दि. 22 - शाळांमधील मुलांची उपस्थिती वाढावी, त्यांना शाळेमध्ये आल्यानंतर अधिक आनंद वाटावा, विद्यार्थ्यांमधील सुप्त कला कौशल्याचा विकास व्हावा, या दृष्टीने इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हीनस भोसले आखाडा येथील मनपाच्या छत्रपती शाहूमहाराज प्राथमिक विद्यालयात वर्षभर हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट राबवित आहे. ही संकल्पना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन डॉ. गौरी बोरकर यांनी केले.
भोसले आखाडा येथील मनपाच्या छत्रपती शाहूमहाराज प्राथमिक विद्यालयात इनरव्हील क्लब ऑफ अहमदनगर व्हीनसच्या वतीने हॅप्पी स्कूल प्रोजेक्ट राबविण्यात येत असून, फलकाचे अनावरण जिल्हा सचिव सायली खानदेशी व डॉ. गौरी बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोरकर बोलत होत्या. याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा पल्लवी शिंगी, स्वाती गांधी, सोमा गंगवाल, प्राजक्ता डागा, आरती फिरोदिया, सारिका मुथा, दिवे, वाडगे आदी उपस्थित होते.
बोरकर यांनी यावेळी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून आरोग्यदायी व यशस्वी जीवनाचा मंत्र सांगितला. सायली खानदेशी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. हॅप्पी स्कूल प्रोजेक्टमुळे मुलांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. त्यांची उपस्थिती वाढली असून, त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. दिवे मॅडम यांनी शाळेतील वातावरण आनंदी व उत्साही राहण्यास या उपक्रमामुळे मदत झाल्याचे सांगितले.