Breaking News

बिग बी स्त्री भ्रूण हत्या विरोधी मोहिमेचे सदिच्छादूत होणार?

मुंबई, दि. 22 - स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेचे ब्रँड म्बेसेडर म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. बिग बींना सदिच्छादूत होण्याबाबत विनंती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी, तसंच मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची आवश्यकता आहे. समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. हा उपक्रम प्रभावशाली होण्यासाठी या मोहिमेचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्यासाठी अमिताभ बच्चन यांना विनंती करण्यात येणार आहे. बिग बी हे राज्य शासनाच्या वन विभाग तसंच क्षयरोग प्रतिबंधक मोहिमेचेही ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत.
सांगलीतील म्हैसाळमध्ये स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर स्त्रीभ्रूण हत्या विरोधी राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार भारती लव्हेकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. राज्यात मुलींचा जन्मदर काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहे, ही दिलासादायक बाब आहे. राज्यात सर्वाधिक जन्मदर हा भंडारा जिल्ह्यात आहे. 2015 च्या तुलनेत राज्यात 78 अंकांनी मुलींचा जन्मदर वाढला आहे. सर्वात कमी जन्मदर वाशिम जिल्ह्याचा असून ही मात्र चिंताजनक बाब असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.