10 जिल्हा परिषदांवर झेंडा रोवून भाजप एक नंबरवर
25 पैकी दहा जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांवर भाजपनं बाजी मारली आहे. 6 ठिकाणी आपले अध्यक्ष बसवून राष्ट्रवादीनं दुसरा क्रमांक पटकावला आहे. 5 जिल्हा परिषदांवर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर 4 ठिकाणी शिवसेनेचे. त्यामुळे नगरपालिका, महापालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यात समोर येताना दिसत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसनं शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. तर भाजपनंही मुख्य विरोधक असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन काही ठिकाणी सत्ता हस्तगत केली आहे.
मुंडे भावाबहिणींच्या वादामुळे प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंनी सुरेश धस यांना आपल्या जाळ्यात ओढून धनंजय मुंडेंना धक्का दिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे जास्त सदस्य असूनही भाजपचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. नाशिकमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी चक्क शिवसेना-काँग्रेस आणि माकप अशी आघाडी बघायला मिळाली. तर सोलापुरात भाजपनं काँग्रेससोबत महाआघाडी करुन राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव केला.
