Breaking News

पोलीस उपअधीक्षकपदी भाऊसाहेब ढोले यांची निवड ; गावकर्‍यांनी केला जल्लोष

अहमदनगर, दि. 18 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पाथर्डी तालुक्यातील (हल्ली रा. नगर) दुलेचांदगाव येथील रहिवाशी भाऊसाहेब कैलास ढोले यांची पोलीस उपअधीक्षक पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल ढोले यांचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून त्यांनी हे यश मिळविले आहे. 
राज्य लोकसेवा आयोगाने या परीक्षेत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी या पदाच्या निवडी घोषित करण्यात आल्या. त्यात भाऊसाहेब ढोले यांना 498 गुण मिळाल्याने त्यांची पोलीस उपअधीक्षपदी निवड झाली. त्यांनी पुणे येथे या परीक्षेचा अभ्यास केला होता. ते सध्या विक्री कर निरीक्षक म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत.त्यांनी दुलेचांदगाव येथील सच्चिदानंद बंडोबा महाराज विद्यालयात शिक्षण घेतले. नंतर नगरच्या न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातून संगणकशास्त्र (बीसीएस) या विषयाची पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यापूर्वी त्यांची सार्वजनिक बांधकाम विभागात वरीष्ठ लिपीक या पदावर निवड झाली होती. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांची विक्री कर निरीक्षकपदावर निवड झाली. त्यातच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवून पोलीस उपअधीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळविले. निवडीबद्दल दुलेचांदगाव, पाथर्डी येथे मित्र परिवार,ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.