खेळाडूंना घडविण्यासाठी एपीएलसारख्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन गरजेचे
। आमदार संग्राम जगताप यांचे प्रतिपादन
अहमदनगर, दि. 18 - नगरमध्ये अनेक चांगले क्रिकेटपटू असून, एपीएल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अशा स्पर्धामुळे क्रिकेटपटू घडण्यास मोठी मदत होते. नगर जिल्ह्याने आतापर्यंत अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय स्तरावर दिले असून, त्यामुळेच अशा स्पर्धांचे वेळोवेळी आयोजन होणे ही गरज वाटते. ही स्पर्धा कुठल्याही पक्षाने आयोजित केलेली नाही. चांगल्या खेळाडूंना न्याय देण्याचे काम या स्पर्धेतून होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.अ.नगर जिल्हा क्रिकेट असो.च्या वतीने वाडिया पार्क येथे आयोजित एपीएल क्रिकेट स्पर्धेचा हवेत फुगे सोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते. याप्रसंगी कोहिनूर चॅम्पीयनचे अश्विन गांधी, हुंडेकरी लॉयन्सचे वसीम हुंडेकरी, क्वेरा चॅलेंजर्सचे राहुल धापटकर, सोहम सुपरकिंगचे नरेंद्र फिरोदिया, ईशवेद कॉरियर्सचे संदीप बोरा, साईदीप हिरोजचे नीलेश चोपडा, सुधीर तावरे, योगेश गलांडे, नगरसेवक कुमार वाकळे, माणिक विधाते, विपूल शेटिया, कैलास गिरवले, गणेश गोंडाळ, पवार, आदेश चंगेडिया, राहुल वाकळे, श्रीनिवास कनोरे, सचिन मुनोत, मनीष नय्यर, मयूर शेटिया, राजेश भंडारी, प्रा. अरविंद शिंदे, उबेद शेख, संजय झिंजे, दीपक सूळ, महेश कराळे, रेखा जरे आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, ही स्पर्धा शहरापुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या मुलांनाही या स्पर्धेत समावेश करून घेतला आहे. नगर शहरामध्ये फक्त क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धा होते. आता ही डे-नाईट स्पर्धाही सर्वांच्या सहकार्याने होत आहे, असे सांगितले.
गणेश गोंडाळ म्हणाले की, आ. अरुण जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेला सुरुवात केली असून, हे स्पर्धेचे द्वितीय वर्ष आहे. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1 लाख 11 हजार 111, द्वितीय 71 हजार, मॅन ऑफ सिरीज म्हणून हिरोहोंडाचे दुचाकी वाहन असेल. या स्पर्धेत 6 टीम तयार करून 19 सामने खेळविले जातील. यामध्ये 120 खेळाडू निवडण्यात आले आहेत, असे सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, आयपीएलच्या धर्तीवर नगर शहरामध्ये ही एपीएल क्रिकेट स्पर्धा संपन्न होत आहे. या स्पर्धेत नामांकित खेळाडू खेळत असून, नगरकरांनी या टुर्नामेंटचा आनंद घ्यावा, असे ते म्हणाले. प्रा. विधाते यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.
