त्रिवेंद्र सिंग रावत यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ
डेहराडून, दि. 19- त्रिवेंद्र सिंग रावत यांनी शनिवारी उत्तराखंड राज्याच्या 9 व्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उत्तराखंडचे राज्यपाल कृष्णकांत पॉल यांनी त्रिवेंद्र सिंग रावत यांना शपथ दिली. शनिवारी दुपारी 3 वाजता डेहराडूनमधील परेड मैदानात हा शपथविधी सोहळा पार पाडला. सतपाल महाराज यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्रिवेंद्र रावत यांच्यासह अन्य 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.
