निंबोडी येथील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्जतचा पै.अजित शेळके विजयी
। उपविजयी मल्ल संतोष गायकवाड याला 11 हजार रु. तर आंमत्रित कुस्ती मधील विजयी मल्ल संग्राम कुंताल याला गदा
अहमदनगर, दि. 16 - नगर तालुक्यातील निंबोडी येथे नेहरु युवा केंद्र, जय मल्हार युवा प्रतिष्ठाण व निंबोडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेच्या 74 किलो वरील खुल्या वजन गटात पै.अजित शेळके विरुध्द पै.संतोष गायकवाड (दोन्ही मल्ल ता. कर्जत) यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात पै.शेळकेने 3-2 गुणांनी विजय मिळवला. तसेच पै.संग्राम कुंताल विरुध्द पै.मुक्तार सय्यद यांच्यात झालेल्या आमंत्रित कुस्तीमध्ये पै.कुंताल विजयी ठरला. विजयी मल्ल अजित शेळके यास 21 हजार रु. व चांदीची गदा, उपविजयी मल्ल संतोष गायकवाड याला 11 हजार रु. तसेच आंमत्रित कुस्ती मधील विजयी मल्ल संग्राम कुंताल याला चांदीची गदा पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संदिप भोंडवे, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे, महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस, पै.सचिन यलभर, मनोज कोकाटे, प्रविण कोकाटे, सहा.पो.नि. विनोद चव्हाण, नामदेव लंगोटे, संदेश कार्ले, शिवा शिंदे, अंजली देवकर, रामा नलकांडे, बाळासाहेब जगताप, योगेश पवार, पै.भाऊसाहेब धावडे आदिंसह जिल्ह्यातील नामवंत मल्ल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कुस्ती स्पर्धा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांनी सुमारे 3 लाखाची लोकवर्गणी केली होती. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे देखील सहकार्य लाभले आहे. कुस्ती स्पर्धेत 210 मल्लांनी सहभाग नोंदवला असून, निंबोडीच्या लाल मातीत मल्लांच्या डावपेचांचा थरार रंगला होता. स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्यातील कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. कुस्तीचे बहारदार समालोचन बाबा लिमण यांनी केले. पंच म्हणून रवी बोथरे, अॅड.समीर पटेल, पै.नाना डोंगरे, गणेश जाधव, संभाजी निकाळजे काम पाहत आहे. कुस्तीस्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हा तालिम संघाचे मार्गदर्शन लाभले.
कुस्ती स्पर्धेतील सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे- 35 किलो वजन गट विजयी- शेख सैफ (आष्टी), उपविजयी- मुकुल पालवे (भिंगार). 40 किलो वजन गट विजयी- वैभव वेताळ (भाळवणी), उपविजयी- ओंकार भाळवणी . 45 वजन गट विजयी- शुभम भोसले (कर्जत), उपविजयी- शुभम मासाळकर (भाळवणी). 57 किलो वजन गट विजयी- अमर पांडे (कर्जत), उपविजयी- अरबाज सय्यद (नगर). 65 किलो वजन गट विजयी- संदिप कावरे (पारनेर), उपविजयी- विकास गीर (रुई). 74 किलो वजन गट विजयी- किरण नलावडे (कर्जत), उपविजयी- विकास सासवडे (नगर), गदासाठी घेण्यात आलेल्या आमंत्रित कुस्ती स्पर्धेत विजयी- संग्राम कुंताल, उपविजयी- मुक्तार सय्यद. 74 किलो वरील खुला वजन गट विजयी- अजित शेळके (कर्जत), उपविजयी- संतोष गायकवाड (कर्जत) या विजयी व उपविजयी मल्लांना आकर्षक रोख स्वरुपातील बक्षिसे देण्यात आली.