मराठा महासंघाचा आमदार परिचारकांच्या घरावर मोर्चा; परिचारक निलंबित
कराड, दि. 11 (प्रतिनिधी) : मराठा महासंघाचे कार्यकर्ते, माजी सैनिक, वीर माता, वीर पत्नी तसेच कोल्हापूरातील मराठा महासंघाच्यावतीने पंढरपूर येथील आ. प्रशांत परिचारकांच्या घरावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी सातारा, कराड व कोल्हापूर येथील मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, समाजात वाढत चाललेला असंतोष व लोकांच्या मागणीचा विचार करून आमदार परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
आ. प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ परिचारकाच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी 10 वाजता पंढरपूर येथील शिवाजी चौकातून निघालेला मोर्चा प्रदक्षिणा मार्गावरून पुढे चौकात जाताच तेथे पोलिसांनी अडवला. मोर्चेकर्यांना परिचारकांच्या घराकडे जाण्यास अटकाव केला. त्यामुळे मोर्चेकर्यांनी चौकात निषेध सभा घेवून आ. परिचारकांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून आलेल्या माजी सैनिक व त्यांच्या पत्नी व वीर मातांनी मनोगते व्यक्त करून जाहीर निषेध नोंदवला.
माजी सैनिकांच्या मागणीसह आक्रमक पवित्र्याचा अंदाज घेऊन अधिवेशन काळात गैरप्रकार होवू नये. याबाबत पोलीस प्रशासनास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आमदार परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आले.
