Breaking News

शेतीसह सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : रावसाहेब दानवे

मुंबई, दि. 19- शेती आणि ग्रामीण क्षेत्राच्या विकासावर भर देतानाच रोजगार निर्मिती व पायाभूत सुविधांचा विकास यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. गरीब कल्याणासह राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी व्यक्त केली.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत करताना मा. खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने केलेल्या कामामुळे गेल्या दोन वर्षांत शेतीचा विकास दर वाढून 12  टक्के झाला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतीक्षेत्राच्या विकासाची आणि ग्रामीण भागाच्या कल्याणाची प्रक्रिया पुढे चालू राहील अशा तरतुदी केल्या आहेत. सामुहिक गट शेती आणि शेतमालाची वाहतूक चांगल्या रितीने होण्यासाठी कोल्ड व्हॅन देण्याची योजना या नव्या योजना चांगल्या आहेत. कृष्णा - मराठवाडा प्रकल्पाच्या पाणीवाटपाचा पहिला टप्पा चार वर्षात पूर्ण करणे व त्यासाठी 250 कोटींची तरतूद महत्त्वाची आहे. शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आठवडी बाजार योजनेची व्याप्ती वाढविणे आणि जलयुक्त शिवारसह विविध सिंचन योजनांवर भर यामुळे शेती क्षेत्राला मदत होईल.
मा. खा. रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, ग्रामीण भागात तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करणे, ग्रामसडक योजनेसाठी सोळाशे कोटींची तरतूद आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाख घरे बांधणे या महत्त्वाच्या योजना आहेत. रस्ते बांधकामासाठी सात हजार कोटींची तरतूद, शिर्डीसह विविध विमानतळांचा विकास, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइन्फ्राची स्थापना, ओबीसी मंत्रालयासाठी अडीच हजार कोटींची तरतूद, अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी दोनशे कोटींची तरतूद आणि अल्पसंख्य समाजातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना या सर्व प्रस्तांवाचा विचार करता हा अर्थसंकल्प राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडले आहे.