Breaking News

मार्केटयार्डात ट्रॉपीक जाम शेतकरी हैराण;बाजार समिती बेजार

लातूर, दि. 24 -  लातूर कृषि उत्पन्न बाजार समिती आवारामध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आपण उत्पादीत केलेले धान्य आणल्यामुळे मार्केटच्या परिसरात 1-1 कि.मी. अंतरापर्यंत धान्य वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अचानक वाढलेली ही आवक लक्षात घेता शेतकर्‍यांनी आपले धान्य बाजार समितीमध्ये सकाळी 6 ते दु. 3 या वेळेतच आणावे असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे. े मार्केटयार्डात ट्रॉपीक जाम  झाल्यामुळे शेतकरी हैराण झाल्याने या भागातील रहिवाशी, व्यापारी यांनादेखील वाहतुकीचा त्रास होत आहे. 
आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये पाय ठेवायलादेखील जागा नव्हती एवढी गर्दी झाली आहे. बाजार समितीकडे येणारे सर्व रस्त्यावर वाहने थांबल्याने रांगाच रांगा लागल्या आहेत. या रस्त्याने वाहनेच जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कालपासून बाजारात हरभर्‍याचा भाव 6 हजार रूपयांपर्यंत वाढल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आपण उत्पादीत केलेला हरभरा वाहनांमध्ये भरून बाजार समितीत आणला आहे. धान्याने भरलेली ही वाहने शिवनेरी गेटपासून बसवेश्‍वर चौकापर्यंत रांगेत उभे आहेत. तर बाजार समितीच्या मोती नगर बाजूच्या गेटपासून कन्हेरी रोड ते चौकापर्यंत धान्याच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हरभर्‍यास भाव वाढल्याने शेतकर्‍यांनी एकाचवेळी बाजारात हरभरा आणला. त्यामुळे ही गर्दी झाली आहे. तसेच तूर खरेदी केंद्रावरदेखील अशाप्रमाणे शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात तूर आणल्याने अक्षरशः त्यांना रांगेत उभे राहावे लागत आहे.
लातूर बाजार समितीच्या इतिहासात अशा पद्धतीने प्रथमच शेतकर्‍यांनी धान्य घेवून गर्दी केली आहे. ही गर्दी पाहून बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकर्‍यांनी आपले धान्य विक्रीसाठी बाजार समितीमध्ये सकाळी 6 ते दु. 3 या वेळेतच आणावे. नंतर आलेल्या धान्यास प्रवेश दिला जाणार नाही, असे आवाहन केले आहे. तसेच बाजारात आलेले धान्य व्यापार्‍यांनी दु. 3 ते सकाळी 6 या वेळेत उचलून न्यावे असे आदेशही व्यापार्‍यांना देण्यात आले आहेत. लातूर बाजार समिती परिसरात प्रचंड गर्दीच गर्दी निर्माण झाल्याने या भागातील रहिवाशी, व्यापारी यांनादेखील वाहतुकीचा त्रास होत आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला या परिसरात असलेल्या रूग्णालयाकडे येणार्‍या रूग्णांची या गर्दीमुळे मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.