पांगरमल प्रकरणातील अधिकार्यांचे निलंबन करा - आण्णाभाऊ साठे युवा मंचची मागणी
। जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण
अहमदनगर, दि. 24 - पांगरमल विषारी बनावट दारु प्रकरणातील संबंधीत पोलिस अधिकारी यांची सीबीआय मार्फत चौकशी करुन, त्यांचे निलंबन करावे. दारुने मृत्युमुखी पडलेल्या व अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे युवा मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. यामध्ये अध्यक्ष अंतोन गायकवाड, प्रभाकर शेलार, कविता शेलार, छाया पेटारे, समाधान पेटारे, निशा पेटारे, सुमन शेलार, रेशमा शिंदे, देवा काकडे, अनिल शिंदे, कविता काकडे, रॉकी पठारे आदि सहभागी झाले होते.पांगरमल येथील विषारी बनावट दारु प्रकरणात अनेक राजकीय पुढारी व पोलिस अधिकारी गुंतलेले आहे. या विषारी दारुमुळे अनेक गरीब शेतकरी कुटुंबातील संसार उध्वस्त झाले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पांगरमल गावात सदर प्रकरण घडले आहे. या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असून, याला खतपाणी घालण्याचे काम येथील पोलिस अधिकारी करत आहे. एमआयडीसी पोलिस अधिकार्यांनी या विषयावर उपोषण करण्यास अंतोन गायकवाड यांना मज्जाव करुन, खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्यास धमकावल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पांगरमल विषारी बनावट दारु प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी. एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या प्रकरणामध्ये पो.नि. राहुल पवार व उपनिरीक्षक देवडकर मॅडम यांचे निलंबन करावे. पांगरमल प्रकरणात मृत्यूमुखी पडलेले व अपंग आलेल्यांना प्रत्येकी 5 लाख रु. ची आर्थिक मदत द्यावी. पांगरमल प्रकरणी उपोषण केल्याने अंतोन गायकवाड यांच्यावरील खंडणीचा खोटा गुन्हा मागे घ्यावा. पांगरमल घटनेला जबाबदार ठरलेले व आचारसंहितेचा भंग केलेल्या जि.प. सदस्य व पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.