Breaking News

जिल्हा ग्राहकमंचामार्फत एस.बी.आय. बँकेच्या शिराळा शाखेस 5 हजाराचा दंड

लातूर, दि. 24 - कर्जाची रक्कम वितरीत न करता 7/12 वर कर्ज बोजा लावून सेवेत त्रुटी पोटी एस.बी.आय. बँकेच्या  शिराळा शाखेला  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने पाच हजाराचा दंड केलेला आहे, अशी माहिती प्रबंधक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
तक्रारदार डॉ. सौ. अंजली सर्जेराव मोरे रा.कानडी बोरगाव ता.जि. लातूर यांनी एप्रिल 2015 मध्ये एस.बी.आय शाखा शिराळा ता.लातूर मधील शाखा व्यवस्थापकास 3 लाख 40 हजार रू.कर्ज रक्कमेची मागणी केली होती. त्यानंतर बँकेने सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने ती आवश्यक ती कागदपत्रे बँकेस दिली व तसेच सदर शाखा व्यवस्थापकानी दि.27 मे 2015 रोजी संबंधीत तलाठयास सदर 3 लाख 40 हजार रू. कर्जाचा बोजा तक्रारदाराच्या नावे असलेल्या मौ.कानडी बोरगाव येथील जमीन गट क्र.150 मधील 1 हेक्टर जमीन व तक्रारदाराचे मौ. तादूळजा ता. लातूर येथील गट क्र. 325 मधील 99 गुंठे 7/12 उतार्‍यावर 3 लाख 40 हजार रू. कर्ज बोजा लावणेबाबत पत्र लिहीले.
त्याप्रमाणे संबंधीत तलाठयाने तक्रारदाराच्या दोन्ही जमीनीवरील 7/12 वर 3 लाख 40 हजार  एस.बी. आय शाखा शिराळा कर्ज असल्याबाबत नोंद केली. त्यानंतर तक्रारदाराने सदर कर्ज रक्कमेची मागणी एस.बी. आय.बँकेच्या शाखा व्यवस्थापकास वारंवार करूनही त्यांनी सदर कर्ज रक्कम तक्रारदारास दिली नाही,व सेवेत त्रुटी दिली म्हणून तक्रारदाराने ग्राहक मंचात तक्रार क्र.187/2015 अन्वये तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीची सुनावणी ग्राहक मंचाचे अध्यक्ष श्री. प्रदीप निटुरकर व सदस्या श्रीमती रेखा जाधव यांच्यासमोर झाली. सदर सुनावणी दरम्यान मंचाच्या असे निर्दशनास आले की, गैर अर्जदार बँकेने कर्ज रक्कम तक्रारदारास वितरीत न करता कर्ज बोजा 7/12 वर लावल्याचे दिसून आले . बँकेने तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली म्हणून ग्राहक मंचाने एस. बी. आय. शाखा शिराळा यांना 5 हजार  दंड ठोठावला. सदर दंडाची रक्कम बँकेने 30 दिवसाच्या आत मंचामध्ये ग्राहक सहाय्यता निधी खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश दिला.
तसेच गैरअर्जदार बँकेने तक्रारदारास विनाकारण आलेला खर्च रुपये 1700/- तसेच मानसीक त्रासापोटी रुपये 5 हजार व तक्रार अर्ज खर्चापोटी रुपये 3 हजार 500 रुपये मुदतीत तक्रारदारास देण्याचा आदेश केला. तसेच तक्रारदाराच्या जमीनीवरील कर्ज रक्कमेचा बोजा कमी करुन देणे बाबतचा आदेश ग्राहकमंच लातूर चे अध्यक्ष प्रदीप निटूरकर व सदस्या श्रीमती रेखा जाधव यांनी पारित केला, असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर मार्फत कळविण्यात येत आहे.