जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन
16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह ; सप्ताहभर विविध कार्यक्रम
बुलडाणा, दि. 17 - जलसंपदा विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा होत आहे, या सप्ताहाचे उदघाटन आज 16 मार्च 2017 रोजी करण्यात आले. जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन व जलरथाचे पुजन पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुनिल चौधरी यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यकारी अभियंता राजेश हुमणे, कार्यकारी अभियंता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग हेमंत सोळगे, जि.प सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कोंडावार, कार्यकारी अभियंता जिगाव उपसा सिंचन विभाग एस व्ही हजारे, सिंचन मित्रमंडळ नांदुराचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, पाणीवापर महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, पंचायत समिती सभापती तस्लीनाबी रसुलखा आदींसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.
याप्रसंगी सामुहिक जलप्रतिज्ञा करण्यात आली. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. अधिक्षक अभियंता श्री. चौधरी यावेळी म्हणाले, 22 मार्च या जागतिक जलजागृती जलदिनानिमीत्त जिल्ह्यात जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी विविध समित्यांचे गठन करुन हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.
अधिक्षक अभियंता सुनिल चौधरी यांनी जलजागृती सप्ताहाअंतर्गत राबविल्या जाणार्या विविध कार्यक्रमांची माहीती देतांना सांगतिले, प्रकल्प लाभक्षेत्रातील प्रत्येक गावांत एक कार्यशाळा किंवा चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सिंचनाचे कायदे, नियम, पाणी वापर संस्थांची संपूर्ण माहीती, होणारे फायदे, सिंचनाचे प्रश्न, अपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, भूसंपादन, पूनर्वसन, उपसा सिंचन परवाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगीतले. जिल्ह्यातील खडकपूर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पूर्णा,ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपुजन यावेळी करण्यात आले.
सप्ताहादरम्यान 19 मार्च रोजी वाटर रन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृव्त स्पर्धा आदी अनुषंगीक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रर्दशन चंद्रकांत साळुंके यांनी केले. यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरीक उपस्थीत होते.
