Breaking News

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या बाजारात गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठींना मागणी

पुणे, दि. 24 - चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! साडेतीन मुहूर्तांपैकी एक. हा सण हिंदू नववर्षाचा प्रारंभ दिन असल्याने पंचगंगापूजन करून घरोघरी गुढ्या उभारण्याची परंपरा आहे.  त्यामुळे  साखरेच्या गाठ्यांना बाजारात मागणी आहे. यंदा 15 टक्क्यांनी साखरगाठी महागल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड, निगडी, भोसरी आदी ठिकाणी बाजारपेठांमध्ये साखरगाठी विक्रीसाठी आल्या आहेत. दहा रुपयांपासून ते पन्नास रुपयांपर्यत या साखरगाठींच्या किंमती आहे. पाडव्याला विशेष महत्त्वपूर्ण मानल्या जाणार्या साखरगाठींना विशेष मागणी असून, छोट्या साखरगाठींच्या हारांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. साखरगाठीमध्ये खारीक व नारळमध्ये असणा-या गाठ्या बाजारात आल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि हिंदू नववर्षारंभाचा दिवस असलेला गुढीपाडवा सण  साजरा होत आहे. शहरवासीयांनी यानिमित्त तयारी सुरू केली असून, बाजारात गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत.
नवीन वस्त्र; तसेच पूजेचे साहित्य बाजारात दाखल झाले असून, रंगीत साखरगाठींना विशेष मागणी आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने सकाळी मुहूर्तावर गुढी उभारली जाणार आहे. त्यासाठी नवीन वस्त्र आणि साखरगाठीचे विशेष महत्त्व असते. बाजारात विविध रंगांमध्ये साखरगाठी विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, मागील वर्षीपेक्षा पाच ते दहा रुपयांनी त्यांची  किंमत वाढल्याची  माहिती  विक्रेत्यांनी दिली.