पदाधिकारी निवडीदरम्यान पाटणकरांशी वाद झाला नाही; आ. शिवेंद्रसिंहराजे
आ. शिवेंद्रसिंहराजे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाम म्हटले आहे की, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा असल्याचे जिल्हा परिषद निवडणूकीच्या निकालावरुन पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आम्ही सर्वच पदाधिकारी नेत्यांच्या आदेशाचे नेहमीच पालन करत आलो आहोत. जिल्हा परिषदेत पक्षाने बहुमत मिळवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कोणाला संधी द्यायची याबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी चर्चेत सहभाग घेवून कोणत्याही दबावाखाली न राहता खुल्या मनाने निर्णय घेतला आहे. आपल्या मतदारसंघाला अथवा तालुक्याला पद मिळावे, ही अपेक्षा त्या तालुक्यातील नेत्याची असते. असे असले तरी, पदाधिकारी निवडी या सर्वांच्या संमतीने आणि एकमताने झाल्या आहेत. अध्यक्षपदी संजीवराजे नाईक-निंबाळकर तर, उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले होते. विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्वांच्या विचाराने पदाधिकार्यांच्या निवडी झाल्या. या निवडीबाबत माझ्यात आणि पाटणकरांच्यात वादावादी झाली नाही. जिल्ह्यातील पक्षाच्या सर्वच नेत्यांच्या सहकार्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली आहे. मी, पाटणकर, बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्वच नेत्यांनी एकमताने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सुचवलेल्या नावांना पसंती दिली आहे. आम्ही सर्वच पदाधिकारी एकदिलाने काम करतो आणि खा. शरद पवार, आ. अजित पवार यांच्या आदेशानुसार यापुढेही एकदिलाने काम करत राहू, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकात नमूद केले आहे.