प्रभावी राष्ट्रनिर्मितीमध्ये युवाशक्तीची महत्वपूर्ण जबाबदारी : थोरात.
कराड तालुकास्तरीय युवा संसद कार्यक्रम; व्यसनमुक्ती,
कॅशलेस इंडियासह स्वच्छ भारत अभियानाचा जागर
कराड, दि. 22 (प्रतिनिधी) : देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक-युवती महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. त्यामुळेच आता युवकांच्या सर्वांगीण विकास करणार्या शिक्षण व संस्कारांची गरज असल्याचे प्रतिपादन ज्ञानदीप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी केले.कार्वे, ता. कराड येथे भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयातर्गंत नेहरु युवा केंद्र सातारा यांच्यावतीने आयोजित कराड तालुकास्तरीय युवा संसद कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एन्व्हायरो फ्रेंडस नेचर क्लबचे उपाध्यक्ष प्रकाश खोचीकर, नेहरु युवा केंद्राचे कराड-पाटण तालुका समन्वयक अजिंक्य शेवाळे, कराड तालुका समन्वयक अनिरुध्द पोरे, संग्राम पवार, किरण पवार, अतुल एटाबे, किशोर फडतरे, अंकुश लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
थोरात म्हणाले, शिक्षण ही जन्मापासून मरेपर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया असून मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो. संघटीत कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तीमत्व विकासाचा वेग वाढतो व समाजाचाही विकास होतो. व्यक्तीमत्व विकास आणि समाजविकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. वाडीवस्त्यांपासून गावागावांचा सर्वांगीण विकास साधण्याचे ध्येय गाठण्यासाठी मानव विकास उंचावला गेला पाहिजे. त्यासाठी शिक्षण, आरोग्य व उपजिवीका यावर युवकांनी लक्ष केंद्रीत केल्यास स्वत:सह कुटूंबाचा आणि पर्यायाने गावांचा विकास शक्य होणार आहे.
या युवा संसद कार्यक्रमात ‘स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर आनंदा थोरात यांनी मार्गदर्शन केले. व्यसनमुक्ती विषयावर अकुंश लोहार यांनी मार्गदर्शन केले. तर कॅशलेस इंडिया या विषयावर प्रकाश खोचीकर यांनी मार्गदर्शन करुन डिजीटल साक्षरतेचे महत्व सांगितले.
अजिंक्य शेवाळे यांनी प्रास्ताविकात तालुकास्तरीय युवा संसद कार्यक्रम आयोजनाचा हेतू व नेहरु युवा मंडळांच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. दिग्विजय पाटील, वैष्णव जाधव यांनी स्वागत केले. स्वप्नील लोंढे यांनी सुत्रसंचालन केले. अनिरुध्द पोरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कराड तालुक्यातील विविध गावांमधील नेहरु युवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
