Breaking News

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध


अध्यक्षपदी संजीवराजे नाईक-निंबाळकर; उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे 

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) : सातारा जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या विशेष सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व उपाध्यक्ष पदी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती वसंतराव मानकुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
आज दुपारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा परिषदेच्या निवडणूकीनंतर झालेल्या पहिल्या विशेष सभेत दुपारी 2.10 वाजता अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांना दिपाली यशवंत साळुंखे व धैर्यशिल धोंडीराम अनपट हे सुचक व अनुमोदक होते. तर उपाध्यक्षपदासाठी वसंतराव मानकुमरे यांनी अर्ज दाखल केला. त्यांना मल्लेश माधव धुमाळ व भारती संदीप पोळ हे सुचक व अनुमोदक होते.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आला. छानणीदरम्यान दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी जाहीर केले. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या कालावधीनंतर मुद्गल यांनी अध्यक्ष पदी संजीवराजे नाईक-निंबाळकर तर उपाध्यक्ष पदी वसंतराव मानकुमरे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 जिल्हा परिषद सदस्य यावेळी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याबरोबरच मसूरचे मानसिंगराव जगदाळे, जावळीचे वसंतराव मानकुमरे सातारा तालुक्यातील प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, कोरेगावचे जयवंत भोसले व पाटणचे राजेश पवार आदी नावे चर्चेत होती. यामध्ये बाजी कोण मारणार याविषयी विविध अटकळी बांधल्या जात होत्या. शेवटी संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी बाजी मारून पहिल्या अडीच वर्षासाठी अध्यक्षपदाचा बहुमान मिळविला. सभागृहात राष्ट्रवादीला र्निविवाद बहुमत असून एकूण 64 पैकी 40 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख,निवास उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थिती निवडी केल्या.