फरारी असलेल्या दोन संशयितांना अटक
सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) : संभाजीनगर येथे खुनाचा प्रयत्न व घरफोडीत फरार असलेल्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खंडाळा येथे अटक केली. या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर गवसणे भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली, की काळ्या रंगाच्या स्प्लेंडरवर दोन संशयित खंडाळा येथे फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने खंडाळ्यातील हॉटेल साई सहारा येथे सापळा लावून धीरज वारलेशा पवार (वय 23, रा. साठेनगर, वाळूज, संभाजीनगर), इजाज ऊर्फ रमेश ठकनेस काळे (वय 27, रा. वाळूज, संभाजीनगर) या दोन संशयितांना पकडले. ही कारवाई सहायक फौजदार पानसांडे, विलास नागे, हवालदार ज्योतिराम बर्गे अर्जुन शिरतोडे, मारुती अडागळे यांनी केली.
