Breaking News

चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

अहमदनगर, दि. 18 - राज्याच्या कानाकोपर्‍यासह आंध्रप्रदेश,गुजरात राज्यातून लाखो भाविकांनी मढी येथे चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.रंगपंचमीच्या दिवशी नाथांनी संजीवन समाधी घेतल्याने या दिवशी नाथभक्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच नाथांच्या काठ्या घेऊन येतात.गेल्या अनेक वर्षातील गर्दीपेक्षा यावर्षी गर्दी अधिक होती.
        भटक्यांची पंढरी म्हणून मढी यात्रा ओळखली जाते.अठरा पगड जातींना यात्रेत मान-पान मिळतो.काल दुपारपासून आज सायंकाळ पर्यंत मधीकडे येणारे व जाणारे सर्व रस्ते वाहनांच्या वर्दळीने फुलून गेले.मढी,मायंबा,वृध्देश्‍वर,मोहटादेवी येथे या निमित्ताने यात्रेचे रूप आले.मोहटा देवस्थान समितीने यंदा भाविकांच्या मुक्कामासह तीन दिवस अखंडपणे महाप्रसादाचे मोफत वाटप करण्यात आले.देवस्थान समितीच्या या राबवलेल्या उपक्रमाचे भाविकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.यावर्षी यात्रेसाठी आलेले बहुतेक भाविक भगवान गडावर सुद्धा दर्शनासाठी गेले.उद्या नाथषष्ठी निमित्त पैठण येथे भाविकांची गर्दी होऊन अमावास्येला भाविक कावडी घेवून मढीला येतात.मढी देवस्थान समिती तर्फे पहाटे महापूजा होऊन समाधी मंदिर खुले झाले.नाशिक,औरंगाबाद,डोंबिवली,बारामती,कल्याण विभागातील भाविक वाजत गाजत सजवलेल्या वाहनांमधून आले.इगतपुरी येथून एसटी च्या सोळा बसेस भाविकांच्या एकाच मंडळाने आणल्या.मावळ प्रांतातील डफ व ताशांचा पारंपरिक वाद्यासह बेधुंदपणे नृत्य करत काढलेली काठीची मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.मढी येथील प्रसिद्ध रेवडीच्या बाजारात सर्वाधिक आर्थिक उलाढाल झाली.उद,नाडा,दवणा वनस्पती,नाथ सांप्रदायाचे पूजा साहित्य आदींची दुकाने यंदा मोठ्या प्रमाणावर थाटली.उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर गर्दी पुन्हा वाढली.यात्रेनिमित्त खेळणी,करमणुकीचे साहित्य,खाऊ गल्ली चांगलीच सजली होती.बहुसंख्येने भटका समाज यात्रेला जमत असल्याने हलवाई बाजार सुध्दा त्याच पद्धतीचा असतो.गावरान पद्धतीच्या जेवणाचा खास आस्वाद घेण्यासाठी भाविक गर्दी करतात.सोलापूर,अकलूज,पंढरपूर,उस्मानाबाद, श्रीरामपूर,चौफुला भागातील खानावळ चालकांनी यंदा गावरान जेवनासाठीची दरवाढ केली.शेतीची अवजारे,मोरपीसे, दुर्मिळ औषधी वनस्पती,बिबे,रुद्राक्ष,स्फटिक माळा, शंख,त्रिशूळ बाजारात ग्राहकांनी सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी केली.देवस्थान समितीने यंदा दर्शन बारीचे नियोजन चांगले केल्याने दर्शनासाठी फारसा त्रास भाविकांना झाला नाही.राज्याच्या विविध भागातून सुमारे पाच हजार काठ्या व शेकडो अस्तन्या(मानाच्या पारंपरिक काठ्या)मढीत कालपासून दाखल होऊन त्यांची मिरवणूक धार्मिक विधी,नाथांच्या समाधी मंदिराच्या कळसाला काठी लावणे,महाप्रसाद देणे घेणे असे विधी पूर्ण होऊन यात्रा संपते.यात्रेत यंदा सापाची कातडी,मुंगूस,व अस्वलांचे केस यांचा वापर झाला नाही.डुकरांच्या केसांचा तुरळक वापर झाला.गाढवाच्या बाजार सुध्दा गेल्या पाच वर्षापासून आतित्वासाठी झगडत आहे.आवक ग्राहक सुध्दा कमी अशी बाजाराची परिस्थिती होती.शांतता समितीच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे प्रत्येक्षात दारूबंदी झाली नाही. विविध ठिकाणी दारू विक्री जोरात होती.