मार्केट कमिटेचे सभापतींचे 17 पैकी 14 संचालकांनी सह्याचे अधिकार नाकारले
। भाजपचे उपसभापती वैभव पाचपुते, काँग्रेसचे संचालक संजय जामदार किंवा भाजपचे लक्ष्मण नलगे या दोघांपैकी एक यांना अधिकार देण्याचा ठराव
अहमदनगर, दि. 18 - सह्याचे अधिकार देण्यासाठी बोलविलेल्या मार्केट कमिटीच्या सभेत 24 दिवसापूर्वी सभापती झालेले धनसिंग भोयटे यांना कामकाजावर आणि चेकवर सह्या करण्याचे अधिकार उपस्थित 17 संचालकांपैकी 14 संचालकांनी नाकारून ते अधिकार भाजपचे उपसभापती वैभव पाचपुते आणि काँग्रेसचे संचालक संजय जामदार किंवा भाजपचे लक्ष्मण नलगे या दोघांपैकी एक यांना देण्याचा ठराव केला. काँग्रेसचे धनसिंग भोयटे, भास्कर वागस्कर आणि संजय महांडुळे या तिघांनी धनसिंग भोयटे यांना सह्याचे अधिकार द्यावेत , असे सभेत पत्र दिले. काँग्रेसच्या संचालिका उर्मिला गिरमकर गैरहजर राहिल्या. काँग्रेस - राष्ट्रवादीचे 10 पैकी 7 संचालक फुटले व ते भोयटे यांच्या विरोधात गेले.23 ऑक्टोबर 2016 रोजी झालेल्या श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसआणि राष्ट्रवादीचे दहा संचालक आणि भाजपचे आठ संचालक निवडून आल्यावर 3 नोव्हेंबर 2016 रोजी सभापतीपदी बाळासाहेब नाहाटा आणि उपसभापतीपदी धनसिंग भोयटे निवडून आले. नाहाटा यांनी आपली पत्नी मनिषा नाहाटा यांना पंचायत समितीला उभे केल्यावर आपल्या सभापती पदाचा राजीनामा देऊन आपला उर्वरित कालावधी संजय जामदार यांना देण्याची इच्छा व्यक्त केली.परंतु काँग्रेसच्या श्रेष्ठींनी त्यांना न जुमानता भाजपशी बोलणी करून 20 फेब्रुवारी 2017 ला धनसिंग भोयटे यांना सभापती करण्याचा निर्णय लादला. व ते बिनविरोध सभापती झाले. आणि येथूनच काँग्रेसचा खरा खेळ सुरु झाला.
धनसिंग भोयटे यांना बिनविरोध सभापती करण्यासाठी भाजपने सहकार्य करावयाचे आणि त्या मोबदल्यात काँग्रेसने काष्टी आणि आढळगाव जिल्हा परिषद गटात भाजपला आतून मदत करावयाची.बेलवंडी गटातही भाजपने सबुरीचे धोरण घ्यायचे अशी चर्चा निवडणुकीच्या आधी दोन दिवस तालुक्यात चालू होती. प्रत्यक्ष निवडणुकीनंतर काष्टी गटातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 गावांत भाजपला मताधिक्य राहिले.सन 2012 मध्ये मात्र काँग्रेसच्या बेबी गिरमकर यांनी प्रतिभा पाचपुते यांच्यापेक्षा 15 पैकी आठ गावांत 1 हजार 461 मतांचे मताधिक्य घेतले होते.सन 2017 च्या निवडणुकीत नाहाटा यांच्या राजीनाम्या नंतर झालेल्या तडजोडीमुळे काँग्रेसला मताधिक्य देणा-या या आठ गावांनी भाजपच्या सदाशिव पाचपुते यांना 3 हजार 162 मतांचे मताधिक्य दिले. आणि त्यात काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या सांगवी दुमाला मध्ये 165 मतांचे मताधिक्य भाजपला आहे. हा सर्व मार्केट कमिटीच्या राजकारनाचा परिणाम आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक काळातील काँग्रेस आणि भाजप मध्ये झालेल्या तडजोडीची संतप्त प्रतिक्रिया मार्केट कमिटीच्या संचालकांमध्ये दिसून आली व मतलबासाठी तडजोडी करणारांना धडा शिकविण्याचा निर्णय त्यांनी घेतला व काँग्रेसच्या सात संचालकांनी भोयटे यांना विरोध केला. या ठरावाच्या विरोधात धनसिंग भोयटे यांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली असून, ते न्यायालयात गेले तर आम्ही पण त्यांच्यावर अविश्वास दाखल करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका संचालकांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अपरिपक्व नेतृत्वामुळे श्रीगोंदा नगरपालिकेची व पंचायत समितीची सत्ता गेली असून, आता मार्केट कमिटीची सत्ता जाण्याच्या मार्गावर आहे.
