Breaking News

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा शालिनी विखेंची वर्णी

। उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले । शिवसेना काँगेससोबत तर गडाख गट भाजपबरोबर

अहमदनगर, दि. 22 - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी राधाकृष्ण विखे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री चंद्रशेखर घुले विजयी झाल्या आहेत. यावेळच्या निवडणुकीत आघाडीमध्ये कोणतीच फुट पडली नाही उलट आघाडी समवेत शिवसेनेने जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे आघाडीचे 41 चे संख्याबळ 52 वर येवून ठेपले. विशेष म्हणजे श्रीरामपूरच्या महाआघाडीने सुध्दा मतदान केल्यामुळे संख्याबळ वाढले व दुसरीकडे भाजप व गडाख गट एकत्र आले उपाध्यक्षाच्या निवडीत घुले यांना मतदान न करण्याचा अपक्ष हर्षदा काकडे यांनी निर्णय घेवून त्यांनी मतदान केले नाही. शालिनी विखे यांची जिल्हा परिषदेवर तिसर्यांदा निवड झाल्याने त्यांनी हॅट्रीक साधली आहे. थोरात गटाला या निवडणुकीत संधी न मिळाल्याने फक्त समित्यांवर समाधान मानावे लागले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी निवडूण आल्यामुळे लोणी दोन लाल दिव्याच्या गाड्या आल्या आहेत.
 अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज दुपारी जिल्हा परिषद सभागृहात मतदान झाले.अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शालिनी विखे व भाजपकडून सदाशिव पाचपुते यांनी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दोन्ही पक्षाकडून दाखल झाल्याने निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या शालिनी विखे यांना 52 तर भाजपचे सदाशिव पाचपुते यांना 19 मते मिळाली. शिवसेनेने या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली तर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाने भाजपला मतदान केले.उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले व क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे दादासाहेब शेळके यांचे उमेदवारी दाखल होते. उपाध्यक्षपदासाठी मतदान होवून घुले यांना 51 मते मिळाली तर शेळके यांना 20 मते मिळाली. शेवगाव तालुक्यातील घुले विरोधक हर्षदा काकडे यांनी उपाध्यक्षपदासाठी घुले यांच्या विरोधात मतदान करून शेळके यांच्या पारड्यात आपले मत टाकले.
अध्यक्षपदासाठी विखे यांना काँग्रेसच्या सर्व सदस्यांसह राष्ट्रवादी व शिवसेना तसेच माजी आ. भानुदास मुरकटे समर्थक दोन अपक्ष व अपक्ष हषर्दा काकडे यांनी मतदान केले, विखे यांना 52 मते मिळाली. पाचपुते यांना भाजप 14 व गडाख प्रणित क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे 5 असे एकुण 19 मतदान झाले. उपाध्यक्षपदासाठी घुले यांना राष्ट्रवादी 18, काँग्रेस 23, माकप 1, शिवसेना 6, मुरकुटे गटाचे 2 असे 51 मते मिळाली तर शेळके यांना भाजपचे 14, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे 5 व अपक्ष काकडे 1 असे 20 मते मिळाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी काम पाहिले. त्यांना उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे, उपजिल्हाधिकारी आनंद आनंदकर, प्रांताधिकारी वामन कदम, तहसीलदार गणेश मरकड,सीईओ रविंद्र बिनवडे यांनी सहाय्य केले.
कै.बाळासाहेब विखेंचे स्वप्न साकार करणार
जि.प.मध्ये आघाडीची सत्ता आली आहे. आगामी काळात गटतट विसरून आपण जिल्ह्याचा विकास करणार असून तळागाळातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. कै. बाळासाहेब विखे यांचे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न आपल्याला साकार करायचे आहेत असे निवड झाल्यानंतर शालिनीताई विखे यांनी सर्वांना सांगितले.
आरोग्य व दुष्काळाच्या प्रश्‍नांवर काम करणार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार व राष्ट्रवादीच्या राज्यातील व जिल्हयातील नेत्यांनी माझ्यावर विश्‍वास टाकून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदावर माझी निवड केली. त्यांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जावू देणार नाही. तसेच जिल्ह्यातील आरोग्यसेवा व दुष्काळाच्या प्रश्‍नांवर काम करणार आहे अशी माहिती नवनिर्वाचीत उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी बोलताना दिली आहे.