Breaking News

कर थकविणाल्याप्रकरणी महावितरणला ग्रामपंचायतीच्या सीलचा जोरदार धक्का

कोरेगाव, दि. 18 (प्रतिनिधी) : मिळकत कराच्या 3 लाख 5 हजार रुपयांच्या थकबाकीपोटी सातारारोड-पाडळी ग्रामपंचायतीने सातारारोड येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला सील ठोकले. महावितरण कंपनीने सील तोडल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार असल्याचे सरपंच सौ. निलांगी फाळके व उपसरपंच तानाजी फाळके यांनी सांगितले. दरम्यान, दुष्काळाची स्थिती असो किंवा काहीही असो कोणताही विचार न करता विज कनेक्शन तोडून लोकांची गैरसोय करणार्‍या महावितरण कंपनीला कर थकविल्याप्रकरणी सातारारोड-पाडळी ग्रामपंचायतीने सील ठोकून चांगलीच अद्दल घडविली आहे.  
सातारारोड-पाडळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत महावितरण कंपनीचे कार्यालय असून तेथे चाचणी विभाग व भांडार विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाकडे गेल्या दोन वर्षापासून 3 लाख 5 हजार रुपयांचा मिळकत कर थकला होता. ग्रामपंचायतीने त्यांना सप्टेंबर 2016 मध्ये रितसर मागणी बील दिले होते. महावितरण कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने जानेवारी 2017 मध्ये पुन्हा बील सादर केले होते. त्याकडेही कंपनीने दुर्लक्ष केले, अखेरीस 10 मार्च 2017 रोजी ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामविकास अधिकारी डी. एल. सुरवसे यांनी कंपनीच्या कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी, कृष्णानगर-सातारा यांच्या नावे जप्ती वॉरंट बजावले होते. त्याकडेही कंपनीने दुर्लक्ष केले होते.
ग्रामपंचायतीने अखेरीस महावितरण कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे गुरुवारी दुपारी कंपनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरपंच सौ. निलांगी फाळके, उपसरपंच तानाजी फाळके, ग्रामविकास अधिकारी डी. एल. सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य अजित  फाळके, शशिकांत फाळके, ग्रामस्थ अमर फाळके, जगदीश फाळके, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील बाबर यांनी सील ठोकले. दरम्यान, महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता माने यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. महावितरण कंपनीने वरिष्ठ कार्यालयाकडे याबाबतचा पत्रव्यवहार केला आहे, त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर थकबाकी भरली जाईल, अशी ग्वाही माने यांनी दिली.
20 कंपन्यांकडे लाखो रुपयांची थकबाकी
सातारारोड-पाडळी स्टेशन ग्रामपंचायतीच्या हद्दीत 20 हून अधिक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांकडे ग्रामपंचायतीच्या मिळकत कराची मोठी थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी त्यांना रितसर बिले देण्यात आली आहेत, मात्र, त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.
महावितरण कंपनीपाठोपाठ इतर कंपन्यांची कार्यालये सील केली जाणार आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांना मिळकत कराची थकबाकी भरण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत. वेळेत कर न भरल्यास, त्यांच्या मूलभूत सुविधा बंद केल्या जाणार आहेत. तसेच थकबाकीदारांची नावे गावातील मुख्य चौकात फ्लेक्स बोर्डावर लावली जाणार असल्याचे सरपंच सौ. निलांगी फाळके व उपसरपंच तानाजी फाळके यांनी सांगितले.