व्यवस्थेवरील वाढते हल्ले !
दि. 24, मार्च - व्यवस्था कोणतीही असो, जेव्हा तिच्यावर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ होते, तेव्हा असे हल्ले का वाढत आहे ?याचा शोध घेण्याची प्राथमिकता ही त्याच व्यवस्थेने घेणे गरजेचे असते. डॉक्टरांवर होणारे हल्ले असेल, किंवा मागे पोलिसांवर देखील हल्ले झाले होते, यामागच्या कारणांचा शोध घेऊन इतका या व्यवस्थेविषयी राग का उत्पन्न व्हावा. कारण हल्ले करण्यास एकच कारण पुरेसे नसते, तर मनामध्ये साचून साचून व्यवस्थेविषयी निर्माण झालेला तो संताप असतो. मात्र असा संताप करणारे लोक कोण आहेत? त्यांची पार्श्वभूमी काय आहे. याचा देखील अभ्यास केल्यास यामागची पार्श्वभूमी लक्षात येते. यातील हल्ले हे शासकीय रूग्णालयात झाले आहेत. शासकीय रूग्णालय म्हटले की, बघणार्यांचा दृष्टीकोन बदलत असतो. शासकीय व्यवस्थेविरूद्ध असणारी अनास्था, शिस्तीचा अभाव यामुळे असे प्रार वारंवार बघायला मिळत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शासकीय रूग्णालयात नातेवाईकासोबत फक्त दोन नातेवाईकांना थांबण्याची मुभा दिली आहे. मात्र सर्वच ठिकाणी नियम धाब्यावर बसवले जातात, आणि जर शिस्त लावण्याचा प्रयत्न केल्यास, त्याला न जुमानता व्यवस्ेथवरच हल्ले होण्याचे प्रकार घडतात. हेल्मेटसक्ती झाल्यांनतर पोलीसांवरच हल्ले होण्याचे प्रमाण वाढले होते. वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर, महिला पोलिसांना मारहाण, गाडी अंगावर घालूून जीवे मारण्याचे प्रकार झाले आहेत. डॉक्टरांवर झालेल्या हल्ले बघता बहुतांशी हल्ले हे निवासी डॉक्टरांवर झालेल्या आहेत. तसेच रूग्णाची वाढती संख्या आणि अपुरे डॉक्टरांचे मनुष्यबळ यांचे प्रमाण देखील तितकेचख चिंताजनक आहे. यामुळे एवढया सगळया रूग्णांना थोपवायचे कसे हा महत्वाचा प्रश्न आहे. तसेच याठिकाणी अपुरे सुरक्षारक्षक आहेत. डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे रूग्णांचे हाल झाले होते. उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने देखील डॉक्टरांना फटकारत मरायची भीती वाटत असेल, तर नोकरी सोडा अशी तंबी दिल्यानंतरही डाक्टरांचे आंदोलन मागे घेण्याचे नाव सुरू नव्हते. आंदोलन आणि संपामुळे हा प्रश्न सुटणार नाही,किंवा हल्ले करणारे थांबणार नाहीत. व्यवस्थेचा जेव्हा माणसाला संताप निर्माण होतो, तेव्हा सामान्य माणूस आक्रमक होतो, बंड पुकारतो. मात्र तोडफोड आणि मारहाणीचे प्रकार सामान्य माणूस करू शकत नाही. तर व्यवस्थेचा नावाखाली गुंडगिरी करू पाहणारे, आणि व्यवस्थेला आपल्या कामासाठी सोयीनुसार वापरणारे, असा पावित्रा घेतात. जर तुम्हाला व्यवस्थेविषयी काही समस्या असतील, तर त्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी पावले उचलण्यास आपली व्यवस्था कटीबध्द आहे का? डॉक्टरांवर होणारे आरोप खुपच गंभीार आहेत. डॉक्टर कसे रूग्णांना लुटतात, औषधी कंपन्याकडून कसे पैसे लाटतात, ते असंवेदनशील असतात, माणुसकीचा धर्म विसरून, प्रत्येक रूग्णांकडे व्यावसायिकतेच्या नजरेतून पाहतात, असे आरोप हल्ली डॉक्टरांवर होत असले, तरी डॉक्टरांवर होणारे हल्ले हे निषेधार्यच आहे. तसेच सर्वसामान्यांना जर हॉस्पिटल्समध्ये काही तक्रार असेल, तर ती त्वरित सुटेल अशी शंकाच नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या काय समस्या आहेत ? याचाही विचार होणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांना संरक्षण पुरविणारा कायदा डॉक्टर प्रोटेक्शन अॅक्ट देखील मंजुर करायला हवा, शासकीय रूग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मान्य झाल्यास हल्ले होण्यामागचे कारणे शोधण्यात यश येईल.
