कार्यकर्त्याची भाकरी नेत्याने का थापायची...?
दि. 24, मार्च - गेली वर्षभर या महाराष्ट्राला भेडसावणारे सारे प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होताच संपलेत.राजकारण्यांचा उल्लू साध्य झाला.त्यांना हवां ते मिळालं क्रांती मोर्चा आणि अन्य विविध प्रकारच्या आंदोलनात व्यस्त ठेवला गेलेला कार्यकर्ता बेरोजगार झालाय.नेते त्यांच्या उद्योगाला लागले.कार्यकर्ता माञ भाकरीसाठी वणवण भटकतोय ,नेत्यांकडे मुद्दा नाही त्या पेक्षा नजिकच्या भविष्यात निवडणूकीचे मुद्देसुद औचित्यही नाही मग नेते कार्यकर्त्याला काम तरी कुठले देणार?महाराष्ट्रात जवळपास सर्वच प्रकारच्या निवडणूका संपल्यात.आता कसे सगळे शांत शांत वाटतयं.ना कुठे प्रचाराच्या गाड्यांचा ताफा फिरतांना दिसतोय,ना कुठे धुरळा उडतांना दिसतोय.कानठळ्या बसवणार्या भोंग्यांचा आवाज तर कधीच बसलाय.ढवळून निघालेले वातावरण निवळून शांत झालयं.निवडणूकीची रणधुमाळी संपवून सर्वच राजकीय पक्षांचे कारभारी आपआपल्या उद्योगाला लागले.स्वतःच्या भाकरीचा शोध संपल्यानेतेही अगदी निश्चिंत आहेत.कार्यकर्ता माञ बेकार झालाय.आणि त्याचा भाकरीचा शोध काही अजून संपत नाही.
निवडणूक जाहीर होण्यापुर्वी जवळपास एक वर्ष हाच कार्यकर्ता नावाच्या प्राण्यातला माणूस भलताच व्यस्त होता.कामाची भ्रांत नव्हती.दिवसभर नेत्यासाठी राबून सध्याकाळची सोय आपोपाप होत होती.
कधी महागाई,कधी करप्रणाली, कधी शेतकर्यांचे प्रश्न, कधी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबाचे कैवार,तर कधी वेगवेगळ्या विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार अशा विविध ज्वलंत प्रश्नांचे मुद्दे घेऊन आपल्या नेत्यांची छबी उजळून टाकण्यासाठी रस्त्यावर बोंबा मारत होता.
इतकेच नाही तर सर्वच समाजाची अस्मिता ऐनवेळी उतू आली आणि क्रांती मोर्चांचं नव अस्र कोलीत बनून कार्यकर्त्याच्या हाती आलं .क्रांती मोर्चाचे उदंड पिक राजकारण्यांनी पिकवलेल्या मतभेदाच्या सुपिक मातीत बहरलं.शेजारच्याच्या शेतीत राजकारणाच्या मेहनतीला आलेले फळ पाहून पलिकडचा नाराज व्हायला नको म्हणून त्याच्याही शेतीत बहुजन क्रांतीच्या प्रती मोर्चाचं पिक घेतलं तेही राजकारण्यांच्या सुदैवाने चांगलच बहरलं.
मराठा क्रांती मोर्चा,ओबीसी क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चांनी सारं सामाजिक वातावरण ढवळून निघालं.विशेष म्हणजे या मोर्चात सर्वांनीच आपले राजकीय जोडे आपल्या पक्षकार्यालयातच सोडले होते,अर्थात त्या जोड्यांची गरज तेंव्हा नव्हती.त्या त्यापुर्वीच आपले काम चोख बजावून हे सारं घडवून आणलं होतं मोर्चे प्रतीमोर्चे ऐन भरात आले असतानाच निवडणूका आल्या आणि सारे एकदिलाने सारं विसरून राजकारणाचे जोडे साफ करायला लागले.निवडणूका जाहीर झाल्या अन् गेली वर्षभर चर्चेच्या टोकावर असलेल्या प्रश्नांनी राजकीय रंग दाखविण्यास सुरूवात केली. त्याच वातावरणात निवडणूका पार पडल्या, मतदान झाले निकालही लागले.नेते मंडळी आपआपल्या कामधंद्याला लागले.माञ वर्षभर कार्यकर्ता माञ बेरोजगार झाला.त्याला काम नाही.कारण आता आणखी एखादी पुढील निवडणूक येत नाही तोपर्यंत नेते मंडळींकडे या कार्यकर्त्याला काम मिळेल असा मुद्दा नाही.कारण मतदानासोबत सारे प्रश्न सुटलेत.सगळीकडे कसा आनंदी आनंद दाटलाय.कुठलाच प्रश्न शिल्लक नाही.मग बिच्चारे नेते मोर्चे आंदोलनासाठी कुठला मुद्दा घेऊन कार्यकर्त्याला काम देतील.ज्याच्यासाठी हा सारा खेळ मांडला होता तो त्यांचा उल्लू तर साध्य झालाय.मग कार्यकर्त्याच्या भाकरीची सोय नेत्याने का आणि कशी करायची?