Breaking News

पुणे महापालिकेत विकास आराखड्यावरून विरोधक-सत्ताधारी आमने सामने

पुणे, दि. 22 - पुणे शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास अराखड्याचे सादरीकरण सभागृहात झालेच पाहिजे आणि राज्यशासनाने पुणे शहराच्या विकास आराखड्यात नक्की कोणते बदल केलेत हे पुणेकरांना समजले पाहिजे. या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच फलक दर्शवत सभागृहात निदर्शने केली. विरोधकांच्या आंदोलनास भाजपच्या नगरसेवकांनी देखील प्रतिउत्तर देत विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
त्याचबरोबर महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह प्रशासनाच्या वतीने प्रमुख अधिकारी का हजर नाही, असे विचारत महापौरांना धारेवर धरले. आयुक्त बैठकीला आलेच पाहिजे. विकास अराखड्याचे सादरीकरण झालेच पाहिजे. या घोषणा देत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मागणी केली. या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून भाजपच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहात विरोधकांच्या समोर येत जोरदार घोषणा बाजी केली. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याच दरम्यान विरोधकांच्या प्रखर मागणीमुळे आयुक्त कुणाल कुमार यांना सभागृहात यावे लागले. आयुक्त येताच विरोधक आपल्या जागेवर गेले. त्यानंतर सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे म्हणाले की, शहराच्या डीपीचे सभागृहात सादरीकरण झाले पाहिजे. यातून आराखडयातील बदल माहिती होणार आहे. मात्र, हे सरकार सादरीकरण का करीत नाही. यामधून काही तरी गौडबंगाल झाल्याचे स्पष्ट होत आहे, अशा शब्दात भाजपवर त्यांनी टीका केली.
काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की, पुणे शहराच्या डीपीमध्ये नागरी हिताचे आरक्षणे उठवण्यात आले आहे, असा आरोप भाजपवर करीत ते पुढे म्हणाले की, या सभागृहातील प्रत्येक सदस्यांना डीपीतील बदल माहिती झाले पाहिजे. यातून खरच नागरिकांच्या हिताचा डीपी केलाय का हे देखील समजेल अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.