Breaking News

महाबळेश्‍वरचे माजी नगराध्यक्ष किसन शिंदे यांचेसह तिघांना सक्तमजूरी

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वर येथील न्यायाधीश पी. ए. कुंभोजकर यांनी नुकताच दिलेल्या निकालाद्वारे श्री साई नागरी पतसंस्थेचे चेअरमन किसन मारुती शिंदे, संचालक लक्ष्मण गणपत कोंढाळकर तसेच सेक्रेटरी संतोष किसन पाठणे यांना करणारा संविधान कलमन्वये दोषी धरून प्रत्येकी एक वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली व त्यामधून मिळणार्‍या दंडाची रकमेपैकी 55 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस देणेचा हुकूम केला आहे.
फिर्यादी सुरेश सरोशियन हे संस्थेचे कर्जदार सभासद होते. सन 2002 मध्ये त्यांनी संस्थेकडे कोरी कागदपत्रे दिली परंतू कर्ज घेतले नाही. त्यानंतर विशेष बाब म्हणजे कर्ज न घेता सरोशियन यांना संस्थेमार्फत कर्ज वसुलीची नोटीस आली. त्यावेळी त्यांनी त्याचे कागदपत्रांचा गैरवापर करून पैशाचे अपहार झालेचे लक्षात आले. त्यांनी त्वरीत श्रीमंत मालोजीराजे बँकेत चौकशी व मागणी केली असता प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडून त्यांची फसवणूक झाली व पैशाचा अपहार झाल्याची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी 2003 साली पोलिसांनी दाद न घेतलेने महाबळेश्‍वर येथील कोर्टात खटला दाखल केला.
हा खटला मॅजिस्ट्रेट कोर्टाने पेालिसांच्या रिपोर्ट आधारे फेटाळला. त्याविरुध्द फिर्यादी यांनी सातारा येथील सत्र न्यायालयात दाद मागितली. कोर्टाने प्रथम दर्शनी पुरावा असल्याचा निष्कर्ष काढला. नंतर महाबळेश्‍वर येथील कोर्टाने खटला पूर्ण चाललेनंतर झालेल्या जबाबाचे आधारे व बँकेतील मुळ चेक त्यावरील आरोपींच्या सह्या व पैसे बेअरर चेकने फिर्यादीच्या सही शिवाय काढून नेलेचे सिध्द झाले. त्या चेकवर सर्व आरोपींच्या सह्या होत्या. या गोष्टी मान्य असल्याने कोर्टाने आरोपी यांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या चेक पुस्तक, रजिस्टर अथवा खाते उतरा याद्वारे त्यांचे विरुध्द केलेले आरोप खोडून काढलेले नाहीत व फिर्यादीतर्फे अँड़ अरविंद कदम यांनी केलेला तोंडी व लेखी युक्तीवाद तसेच आरोपींचा उलटतपास व त्यांनी मान्य केलेल्या बाबींचा विचार करून कोर्टाने सर्व आरोपींना दोषी धरले व शिक्षा दिली. हा खटला तब्बल 15 वर्षे चालला त्यामध्ये 2 वेळा खटला सत्र न्यायालयात गेला होता. व त्यामध्ये फिर्यादीच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद व उच्च न्यायालयाचे निवाडे यांचे आधारे दोन्ही वेळा यशस्वीरित्या जिंकला व अखेर अपंग व्यक्तीस 15 वर्षांनी न्याय मिळाला. या खटल्यामध्ये फिर्यादीतर्फे अँड़ अरविंद कदम, अँड़. विजय जाधव, अँड़. ओमकार कदम यांनी काम पाहिले.