Breaking News

आशा संघटनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बुलडाणा, दि. 30 - जिल्हाभरात आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आशा तथा लिंक वर्कर्स अत्यंत महत्वपूर्ण काम करीत असतात. मात्र, एवढे महत्वपूर्ण काम करुन देखील  त्यांना योग्यप्रकारे मानधन दिले जात नाही. काही तालुक्यात तर आशा व लिंक वर्कर्सकडून अक्षरश: फुकटात काम करवुन घेतल्या जाते. त्यामुळे आशा व लिंक  वर्कर्सचे थकित मानधन त्वरित देऊन पुढील मानधन नियमितपणे द्यावे, अशी मागणी आशा वर्कर्स व  गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे नुकतीच  जिल्हाधिकाजयांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण व शहरी भागात आशा तथा लिंक वर्कर्स गरोदर महिलांची तपासणी करणे, नवजात बालकांची काळजी घेणे,  बालकांचे लसिकरण करणे, माता-बालमृत्यू दर कमी करणे, गरोदर महिलांना पोषक आहाराबाबत मार्गदर्शन करणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करणे यासह  टि.बी., एचआयव्ही, मलेरीया, डेंग्यू यासारख्या साथीच्या आजारांमध्ये लोकांचे आरोग्य सांभाळन्याचे काम करतात. असे असतांना सुध्दा या आशा व लिंक  वर्कर्सना कुठल्याही प्रकारचे निश्‍चित असे मानधन दिल्या जात नाही. चिखलीसह काही ठिकाणी तर आशा व लिंक वर्कर्सना अक्षरश: फुकटात राबवुन घेतले जाते.  त्यामुळे या आशा व लिंक वर्कर्सवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. यास्थितीत आशा व लिंक वर्कर्सना शासनाने ठरवुन दिलेले निश्‍चित असे मानधन व  केसेसनिहाय भत्ते त्वरित द्यावे व मागील थकित रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन देतांना प्रमोदिनी वळसे, ज्योती ठेंग, विजया ठाकरे, सुषमा गिरे, सिंधू मगर, वंदना अवचारे, कंचन परदेशी, खैरुन्नीसा शे. खलील,  सविता जलमकर, शारदा चांभारे, यास्मीनबी चाँद खॉ., संगीता गुरचल, अनिला सुरपाटणे, रुपाली येवतकर, छाया जाधव, संगिता मोरे, रुपाली उगले उपस्थिती  होते.