Breaking News

मंडळ अधिकारी व पोलीसांच्या अंगावर चालविले जेसीबी

बुलडाणा, दि. 11 - गौण खनिजाचे उत्खनन होत असतांना प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न दि. 9 मार्च रोजी राजीव गांधी मिल्ट्री स्कुल या ठिकाणी झाला तर उपस्थित पोलीस कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप केल्यामुळे त्यांच्याही अंगावर मुजोर वाळू माफियाने जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला. परंतू वेळीच सावरल्याने दोघांचे प्राण वाचले याबाबत शहर पोलीसांनी आरोपी चालक व सहायका विरुध्द गुन्हा दाखल केला असून  जेसीबी मशिनसह ट्रॅक्टर पोलीसांनी जप्त केले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल 9 मार्चच्या रात्री तहसिलदार बुलडाणा यांना राजीव गांधी मिल्ट्री स्कुल जवळ अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळाली. यावरुन त्यांनी शैलेश गणेश गिरी मंडळ अधिकारी तहसिल कार्यालय बुलडाणा यांच्यासह कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठविले. या ठिकाणी आरोपी जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करीत असल्याचे आढळून आल्याने गिरी यांनी पोलीस स्टेशनला फोन करुन याबाबत माहिती देत कारवाई साठी पोलीस कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावरुन पोलीस निरीक्षण हिवाळे यांनी डि.बी.पथक प्रमुख हरिष ठाकूर यांना आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी रवाना केले. घटनास्थळी असलेले जेसीबी वाहन क्र. एमएच 28 टी 9199 व ट्रॅक्टर वाहन क्र. एमएच 28 टी 9266 पोलीसांनी पोलीस स्टेशनला नेण्यास सांगितले परंतू यास विरोध करीत ट्रॅक्टर वाहन चालक नामे सतिष चिंतामन जाधव याने त्याचे ताब्यातील वाहन सरळ मंडळ अधिकारी शैलेश गिरी यांच्या अंगावर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जेसीबी चालकाने सुध्दा पोलीस कर्मचारी इंगळे यांच्या अंगावर जेसीबी नेत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि वाहन घेवून पळून गेला. मात्र पोलीसांनी त्यांचा पाठलाग करीता त्यांना अटक केली आहे.
याबाबत फिर्यादी शैलेश गणेश गिरी वय 49 मंडळ अधिकारी तहसिल कार्यालय बुलडाणा यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी आरोपी प्रमोद साहेबराव उबरहंडे वय 19 वर्ष, अमोल पुंजाजी उबरहंडे वय 21 दोन्ही रा.भादोला वाडी, बुलडाणा सतिष चिंतामन जाधव रा.कोलवड यांच्या विरुध्द अपक्र. 104/17 भादंवि कलम 307, 186 सह 46 महा जमीन महसूल संहिता 1966 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि.हिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिष ठाकूर, पोहेकॉ.दिलीप पवार, नापोका सुधिर मगर, पो.ना.शांताराम धुळे, कृष्णा निकम हे करीत आहेत.