Breaking News

हंडा मोर्चा आणि ग्रामपंचायत कार्यालयास टाळे

पुणे, दि. 22 - येथील गावात गेले कित्येक महिने पिण्याचे पाणी मिळत नसल्याने शेवटी गावातील महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकून संताप व्यक्त केला. या संदर्भात सभापती व गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
गावातील ग्रामसेवक वारंवार गैरहजर असतात. ते गावात येत नसल्याने कित्येक नागरिकांची कामे रखडलेली आहेत. गावातील पिण्याच्या पाण्याची योजना विस्कळीत झाली असून, नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने पाण्याविना त्यांचे खूप हाल होत आहेत. येथील नागरिकांनी व महिलांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीलकडे याबाबत मागणी केली आहे.
मात्र, ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारामुळे संपूर्ण गावाला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. तेराव्या वित्त आयोगाचा निधीही त्यांना विकासकामाला वापरता आला नाही. याची सखोल चौकशी करण्यात यावी. गावातील नागरिकांनी (दि. 16) ग्रामसेवकाची चौकशी करून त्यांना निलंबन करण्याबाबत आमदार इंदापूर तालुका, मुख्यधिकारी जिल्हापरिषद पुणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंदनगर, जिल्हा परिषद सदस्य सणसर-लासुर्णे गट यांनाही निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे. मात्र तरीही काम न झाल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेका झाला आणि दि. 20 मार्चला गावतील महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीस कुलूप टाळे लावले. ग्रामसेवकाचे निलंबन त्वरित न केल्यास पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
गावातील काही नागरिकांकडून माहिती घेतली असता असे समजले की, उदमाई संयुक्त पाणी पुरवठा योजना, उद्धट प्रादेशिक पाणीपुरवठा केंद्र घोलपवाडी यांचे वीजबिल साधारण नऊ लाख रुपये थकले असल्याने वीज वितरण विभागाने वीज खंडित केली असल्याने गावातील महिलांना गेले महिनाभर पाणी मिळाले नाही.
एक महिना पाणी मिळाले नसल्याने गावातील नागरिक पाणीपट्टी भरत नसल्याने पाणी सोडण्यासाठी अडचणी येत आहेत. वसुली नसेल तर वीज बिल कोठून भरणार, हा प्रश्‍न आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने गावातील महिलांनी उग्र पवित्रा घेत हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीस टाळे ठोकले.