Breaking News

कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले

। सरकारला जाग येणार का ? शेतीमालाला हमीभाव मिळणार का  ?

अहमदनगर, दि. 24 - गेल्या अनेक दिवसांपासून शेतकर्‍यांना अच्छे दिन येणार असल्याचे गाजर सरकारने दाखवले मात्र अधिवेशनात सत्ताधार्‍यांसह विरोधक आमदारांनी देखील शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या अशी मागणी केली होती. परंंतु कर्जमाफी तार नाहीच मात्र ज्या काही आमदारांनी अर्थसंकल्पाच्या वेळी सरकारच्या विरोधात घोषणा देणार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. यातुन आता शेतकर्‍यांना कर्जमाफी सध्या तरी मिळणार नाही असेच दिसते.
गेल्या तिन चार दिवसात शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुत्र सुरु झाले असल्याचे वातावरण निर्माण होत चालले आहे. अहमदनगर जिल्हयात दोन तर नाशिक जिल्हयात दोघांनी गेल्या चार दिवसात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
कांदा बाजारात गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला 200 ते 650 प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकर्‍यांना कांदा पिकापासून मोठा आधार वाटत होता. मात्र, नगरमधील कांद्याची इतर राज्यात होणारी विक्री कमी होत असल्याने कांद्याला मागणी घटत आहे.त्याचा परिणाम कांद्याच्या भावावर होत असून एकरी 50 ते 60 हजार खर्च कांदा लागवडीसाठी येत आहे. सर्व खर्च जाऊन शेतकर्‍यांच्या हातात काहीच उरत नाही. काबाडकष्ट करूनही काहीच उत्पन्न हातात मिळत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नैराश्य पसरले आहे. याच नैराश्यातून सोमवारी राळेगण म्हसोबा येथील शेतकरी देवराम भापकर यांनी आत्महत्या केली. भापकर यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी काही हात उसने पैसे घेतले होते. गावातील सेवा संस्थेचे 50 हजारांच्या आसपास त्यांच्या नावावर कर्ज आहे. भापकर यांनी आपल्या शेतात कांदा लागवड केली. पण गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला फारच कमी भाव मिळत असल्याने ते अस्वस्थ होते. यातून आलेल्या नैराश्यातून भापकर यांनी शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.