Breaking News

सामना हरल्यानंतर डिनरला ये, जाडेजाचं मॅथ्यू वेडला निमंत्रण

धर्मशाला, दि. 29 - टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाने ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक मॅथ्यू वेडची चांगलीच स्लेजिंग केली. कसोटी हारल्यानंतर आपल्यासोबत डिनरला येण्याचं निमंत्रण जाडेजाने मॅथ्यू वेडला दिलं आहे.
धर्मशालाच्या मैदानावर तिसरा दिवस जाडेजाने चांगलाच गाजवला. गोलंदाजी आणि फलंदाजीने त्याने कमाल करुन दाखवली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव भारताने अवघ्या 137 धावांवर गुंडाळला. या डावात मॅथ्यू वेड 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 106 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 300 धावांचा पाठलाग करताना 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली. यामध्ये जाडेजाच्या दमदार अर्धशतकी खेळीचाही समावेश होता. सामन्यात तुमचा पराभव झाल्यानंतर निवांतपणे सोबत डिनर करु, असं आपण मॅथ्यू वेडला म्हणाल्याचं जाडेजाने सांगितलं. जाडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या डावातही महत्वाच्या तीन विकेट्स घेतल्या.