शेतकरी प्रश्नांसह इतर मागण्यांसाठी ‘तालुकाबंद’ ला प्रतिसाद
। श्रीगोंद्यात 100 टक्के बंद यशस्वी
अहमदनगर, दि. 30 - राज्यातील शेतकर्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, अखंडित वीजपुरवठा करावा तसेच 19 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने ’तालुकाबंद’ ची हाक देण्यात आली होती. या बंदला तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. गावोगावी बंद मागण्यांना पाठींबा देण्यात आला.शेतकर्यांची सर्व कर्ज माफ करण्यात यावीत, भारनियमन कमी करून पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा, ठिबक सिंचनाचे थकीत अनुदान त्वरित देण्यात यावे, हमी भावानुसार तूर खरेदी केंद्र पूर्ववत सुरु करण्यात यावे, कुकडी प्रकल्पाअंतर्गत विसापूर लाभक्षेत्रातील बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, पिसोरे बुद्रुक, शिरसगाव बोडखा, हंगेवाडी या गावांना अवर्तनात प्राधान्याने शेतीसाठी पाणी देण्यात यावे या मागण्यांसाठी तालुक्यात गावोगावी बंद पाळण्यात आला. यामध्ये श्रीगोंदा शहरासह काष्टी, भानगाव, बेलवंडी, चिंभळा, हिरडगाव, लिंपणगाव, वांगदरी, मढेवडगाव आदी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात बंद पाळण्याचे आवाहन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व आमदार राहुल जगताप यांसह सर्वपक्षीय नेत्यांनी केले होते. त्याला शेतकर्यांसह व्यापारी व छोटे दुकानदार यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.