Breaking News

प्रवासी वाहतुकीचे बाद परवाने फेर वाटप करण्याची मागणी

अहमदनगर, दि. 23 - प्रवासी वाहतुक रिक्षाचे बाद झालेले परवाने बेरोजगार लायसन्स, बॅचधारक तरुणांना फेर वाटप करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायत समितीच्या वतीने आ.संग्राम जगताप यांना देण्यात आले. समितीचे अध्यक्ष वैभव जगताप यांनी रिक्षा चालकांच्या विविध प्रश्‍नावर आ.जगताप यांच्याशी चर्चा केली. यावेळी उपाध्यक्ष हमिद देशमुख, ताजोद्दीन मोमीन, सचिन बडेकर, शाहू लंगोटे, सचिव विजय शेलार, गुलाम दस्तगीर, अशोक काळे आदिंसह रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
 शहर व ग्रामीण भागातील अनेक तरुण बेरोजगार असून, सध्या ते आपला उदर निर्वाहासाठी रिक्षा चालवत आहे. रिक्षा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक शासनाचे परवाने नसल्याने त्यांना नाईलाजाने विनापरवाना रिक्षा चालवावी लागत आहे. शासनाच्या दृष्टीने हा गुन्हा ठरत आहे. तरुण वर्गाला बाद झालेले परवाने फेर वाटप केल्यास हे तरुण कायदेशीर मार्गाने आपला रिक्षा व्यवसाय करु शकतील. आरटीओ कार्यालयामधील बाद झालेले परवाने 3 हजार 790 असून, त्यापैकी शासनाने सन 2014 साली1 हजार 900 परवान्यांचे वाटप करण्याचे जाहिर केले होते. त्यापैकी फक्त 462 परवाने अद्याप वाटप करण्यात आले. बाद झालेले सदर परवाने बॅचधारक तरुणांना वाटल्यास अवैधप्रवासी वाहतुकीचा प्रश्‍न मिटून, बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच शासनाच्या महसुलात देखील वाढ होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  शिक्षणाची अट असल्यामुळे 1 हजार 433 परवाने शिल्लक असून, शिक्षणाची अट रद्द करुन, ज्या तरुणांकडे लायसन्स, बॅच असेल त्यांना कायदेशीर व्यवसाय करण्यास परवाने मिळवून देण्याकरिता परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त यांच्याकडे प्रश्‍न मांडून सदर प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी आ.जगताप यांच्याकडे करण्यात आली आहे.