Breaking News

एमआयटीचा चौधरी यांना ‘वायुपुत्र हनुमान कुस्ती महावीर पुरस्कार’ जाहीर

लातूर, दि. 17 - विश्‍व शांती केंद्र माईर्स एमआयटी,तर्फे  ‘राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड राज्य स्तरीय कुस्ती महा-वीर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड  यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी यांना ‘वायुपुत्र हनुमान कुस्ती महावीर विशेष गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. 
सदरील पुरस्कार कुस्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व सलग तीन (3) वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब मिळविलेले चाळीसगाव येथील सायगावचे पहिलवान विजय चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.  सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख रू. 51 हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माईर्स एमआयटी,  व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 19 मार्च 2017 रोजी दुपारी 3.00 वा. आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड राज्य स्तरीय कुस्ती महा-वीर स्पर्धा 2017’च्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘वायुपुुत्र हनुमान कुस्ती महावीर विशेष गौरव पुरस्कार’ पै. विजय चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्‍व शांती केंद्र (आळंदी) माइर्स एमआयटीचे संस्थापक प्रमुख डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
मानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तीन वर्ष किताब जिंकून विजयाची हॅट्रिक त्यांनी साध्य केली आहे. चाळीसगाव येथील प्रसिद्ध मल्ल श्री नथ्थू चौधरी यांचे सुपुत्र असलेले  विजय चौधरी यांनी आपल्या वडिलांकडूनच कुस्तीचे प्राथमिक धडे गिरविले. पुढे पुणे येथे उच्च शिक्षणासाठी आल्यावर त्यांनी मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेतले. अमोल बुचडे, ज्ञानेश्‍वर मांगडे व रोहित पटेल हे त्यांना गुरू रूपात लाभले. पुढे भारतातील अनेक मानाच्या स्पर्धांमधून त्यांनी विविध किताब जिंकले असून, 2020 सालच्या टोकियो ऑलिंपिक्समध्ये भारतातर्फे सुवर्ण पदक प्राप्त करायचा ध्यास त्यांनी घेतला आहे. पै.विजय चौधरी यांनी कुस्तीत क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल त्यांना ‘वायुपुुत्र हनुमान कुस्ती महावीर विशेष गौरव पुरस्कार’ देण्यात येत आहे.