Breaking News

जलयुक्त शिवार अभियानासाठी पुण्याच्या म्पासेट कंपनीकडून 18 लाख 54 हजाराचा निधी

लातूर, दि. 24 - जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांसाठी पुणे येथील म्पासेट या खाजगी कंपनीकडून 18 लाख 54 हजाराचा निधी देण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडे म्पासेट कंपनीचे साईट मॅनेजर संतोष चौधरी यांनी 18 लाख 54 हजाराचा धनादेश आज सुपुर्द केला. यावेळी लातूर महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार, म्पासेट कंपनीचे प्रतिनिधी गिरीष कुलकर्णी, ज्ञानेश कावडे ,ल्वीन शहा उपस्थित होते.
म्पासेट कंपनीचे साईट मॅनेजर श्री. कुलकर्णी म्हणाले की, राज्यातील टंचाईची परिस्थिती निवारण्याच्या कामात जलयुक्त शिवार अभियान हा राज्य शासनाच्या उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे या अभियानासाठी मुख्यमंत्री निधी मध्ये म्पासेट कंपनीकडून मदत देण्यात येणार होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाशी सदर निधीबाबत चर्चा केली असता हा निधी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावा असे सूचविण्यात आले. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांसाठी 18 लाख 54 हजाराचा धनादेश देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. पोले यांनी सदर निधीतून लातूर तालुक्यातील हरंगुळ गावात सिमेंट नाला बंधा-याची दोन कामे होवू शकतील असे सांगून म्पासेट कंपनीच्या प्रतिनिधींनी हरंगुळ गावांत सदर सिमेंट नाला बंधा-याच्या जागेची पाहणी शाखा अभियंता श्री. काळे यांच्या समवेत करावी, असे सूचित केले.
जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान कामांसाठी पुणे येथील म्पासेट कंपनीने 18 लाख 54 हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी श्री. पोले यांच्याकडे दिलेला आहे. या निधीमधून हरंगूळ ता. लातूर येथे दोन सिमेंट नाला बंधा-याची कामे होवून या परिसरातील शेतीला पूरक सिंचन उपलब्ध करुन दिले जाणार आहे. तरि म्पासेट कंपनीचे साईट मॅनेजर संतोष चौधरी, सुरक्षा मॅनेजर गिरीश कुलकर्णी , एच न्ड आर मॅनेजर ज्ञानेश कावडे व फायनान्स मॅनेजर ल्वीन शहा यांनी हरंगुळ गाव परिसरात दोन सिमेंट नाला बंधा-याकरिता जागेची पाहणी केली.  यावेळी त्यांच्या समवेत शाखा अभियंता श्री. काळे उपस्थित होते.