Breaking News

2 एप्रिल रोजी पोलीओ लसीकरण

0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पोलीओचा डोस पाजण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 - जिल्ह्यात दोन सत्रात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत रविवार, 2 एप्रिल 2017 रोजी जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण  करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना या दिवशी पोलीओ डोस पाजण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी 1924 पोलीओ बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. 
जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नसल्याची काळजी घेण्यात येत आहे. लसीकरण झालेल्या सर्व बालकांच्या डाव्या करंगळीवर मार्कर पेनने खुण करण्यात येणार असून यासाठी मोबाईल पथक, ट्रन्झिट टीम आदी सज्ज ठेवण्यात येत आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात 1 लक्ष 95 हजार 908 बालके असून शहरी भागात 61 हजार 377 बालके आहे. अशाप्रकारे एकूण 2 लक्ष 57 हजार 285 बालके अपेक्षीत आहे. सर्व बालकांना लसीकरणाकरिता 1924 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यात आरोग्य विभागासोबत विविध विभागातून एकूण 5122 कर्मचारी सहकार्य करणार आहे. त्यासाठी 382 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येकाने आपले 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक असल्यास ते पोलीओ डोसपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.