Breaking News

बी.जे.मेडिकल 1973 बॅचचे स्नेहसंमेलन नगरला उत्साहात संपन्न

अहमदनगर, दि. 16 - बी.जे.मेडिकल कॉलेज (पुणे) येथे प्रशिक्षित झालेल्या 1973 च्या बॅचचे स्नेहसंमेलन नगरच्या यश पॅलेस येथे उत्साहात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनात पुणे, सोलापुर, नाशिक, अहमदनगर येथील 70 प्रथितयश डॉक्टर्सनी आपला सहभाग नोंदविला. याच स्नेहसंमेलनात या बँचचे डॉक्टर सुधीर तांबे यांची विधान परिषदेवर तिसर्‍यांदा निवड होऊन आमदार झाल्याबद्दल तसेच डॉ.तांबे यांच्या पत्नी सौ.दुर्गाताई तांबे या संगमनेर नगर परिषदेच्या अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुण्याचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.दिलीप सारडा यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजन डॉ.विजय व सौ.माधुरी सोनार यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.विजय सोनार यांनी प्रास्तविक करुन स्वागत केले. डॉ.संजय शिंदे (नाशिक) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सर्व डॉक्टर्सनी आठवणी, येत असलेले अनुभव, कौटूंबिक माहिती सांगून परस्परांशी संवाद साधला. डॉ.आसाराम खाडे व डॉ.खेडकर, डॉ.अजित देशपांडे, डॉ.किशोर बघे (श्रीरामपुर), डॉ.विलास काकडे, डॉ.डी.के.शिंदे, डॉ.जांभळे, डॉ.मनमत राऊत, डॉ.पंडीत, डॉ.राधाकृष्ण ठुबे यांनी आपले विचार व्यक्त केले.
सत्कारास उत्तर देतांना आ.डॉ.तांबे यांनी सर्व सहकारी मित्रांचे आभार मानले. व आजपर्यंत सामाजिक जाणिवेतून सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. केवळ यामुळे आज माझ्या कार्यावर मतदारांनी विश्‍वास दाखविल्यामुळेच तिसर्‍यांदा विधान परिषदेवर निवडून गेलो असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.