मुंबई महापालिकेचा 12 हजार कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर
शिवसेनेला आश्वासनाचा विसर, मालमत्ता कर सवलीतत तरतूद नाही
मुंबई, दि. 29 - मुंबई महापालिकेचा 2017-18 साठीचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. आयुक्त अजॉय मेहता यांनी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 12 हजार कोटीची घट करण्यात आली आहे. यंदा 25 हजार 141 कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. म्हणजेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अर्थसंकल्पात तब्बल 12 हजार कोटींची घट झाली आहे.या अर्थसंकल्पात बेस्टसाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात महापालिका बेस्टला काय देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण कोणतीही भरीव तरतूद करण्यात न आल्यानं बेस्टचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी अंदाजित खर्च 12 हजार कोटी आहे. तसंच गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे.
दुसरीकडे रस्ते कामांमध्येही यंदा बरीच काटकसर करण्यात आली आहे. रस्ते पुर्नबांधणीसाठी 1,095 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी 2886 कोटी एवढी तरतूद होती. तर यंदा नाले सफाईसाठी 74 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, मागील वर्षी नाले सफाई आणि रस्ते घोटाळ्यांवरुन विरोधकांनी शिवसेनेला टार्गेट करत अक्षरश: रान उठवलं होतं.
मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याचं शिवसेनेचं आश्वासन हवेतच विरलं आहे. महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेनं मुंबईतल्या 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं तसंच 500 ते 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता करात सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. मुंबई महापालिकेमध्ये आज बजेट सादर करण्यात आलं, पण या बजेटमध्ये मालमत्ता करमाफीबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. यामुळे निवडणुकीपूर्वीचं शिवसेनेचं आश्वासन हवेतच विरलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.