Breaking News

‘जलयुक्त शिवार अभियान, सातारा’ सचित्र पुस्तक

सातारा, दि. 26 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात राबविलेल्या जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून 1.3 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण केला आहे. जिल्ह्याच्यावतीने या कामांवर आधारित ’जलयुक्त शिवार अभियान, सातारा’ हे सचित्र पुस्तक तयार करण्यात आले आहे.
प्रशासकीय उपक्रम, जसंधारण, विविध उपचार, भरलं शिवार आणि तांत्रिक माहिती अशा 4 विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या यशस्वी कामांची माहिती या पुस्तकात सचित्र मांडण्यात आली आहे. प्रशासकीय उपक्रमामध्ये प्रशासनाने केलेल्या प्रक्रिया, अभियान, प्रत्यक्ष श्रमदान याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जलसंधारण विविध उपचारांमध्ये यांत्रिकी विभागाने केलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.
भरलं शिवार या विभागात या अभियानाचा दृश्य परिणाम पहायला मिळतो. विविध गावांच्या यशकथांचा प्रामुख्याने त्यात समावेश केला आहे. तर तांत्रिक माहिती या शेवटच्या विभागात जलसंधारणांच्या विविध उपचारांची तांत्रिक माहिती देण्यात आली आहे. चारही विभागाच्या माध्यमातून अपेक्षित समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, जलयुक्त शिवारअंतर्गत झालेले काम छायाचित्रांसोबतच चित्रफितीच्या माध्यमातून पाहता यावे, म्हणून ’क्यू आर कोड’ चा वापर या पुस्तकात प्रामुख्याने करण्यात आला आहे. क्यू आर कोडची संकल्पना शासकीय प्रकाशनात राबविणारे राज्यात हे एकमेव पहिले पुस्तक असावे. क्यू आर कोड रिडरच्या माध्यमातून आपण आपल्या मोबाईलवर झालेल्या कामांची चित्रफित पाहू शकता, हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.