Breaking News

ऐतिहासिक वास्तूवैभवाचे जतन, संवर्धन करण्याची गरज : मुख्यमंत्री

मुंबई, दि. 26 - ऐतिहासिक वास्तूवैभवाचे जतन आणि संवर्धन करणे काळाची गरज आहे.  ऐतिहासिक वास्तू आपली वैयक्तिक संपत्ती  समजून प्रत्येकाने  त्याचे जतन केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटी येथील नुतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाच्या उदघाटनप्रसंगी केले.
एशियाटिक सोसायटी येथील मध्यवर्ती ग्रंथालयाच्या मुख्य सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले. बांधकाम विभागाकडे  नुतनीकरणासाठी घेण्यात आलेल्या या मुख्य सभागृहाचे काम पूर्ण झाल्याने ते उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मा.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हस्तांतरीत करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी,  पर्यटन विभागाच्या सचिव श्रीमती वल्सा नायर - सिंह, आदी  उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एशियाटिक सोसायटी येथील नुतनीकृत मध्यवर्ती ग्रंथालयाची मुख्य सभागृह ही मुंबईकरांसाठी नवीन वर्षात एक पर्वणी उपलब्ध झाली आहे. नुतनीकृत या सभागृहामध्ये अनेक प्रकारची दुर्मिळ व वाचकांसाठी उपयुक्त अशी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा वाचकांनी लाभ घ्यावा. तसेच ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयाच्या बाह्यभागात आजवर अनेक चित्रपटांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. यापुढे नुतनीकृत सभागृहामध्ये सुट्टीच्या दिवशी चित्रिकरणाची परवानगी देण्याचा विचार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, उदघाटनानंतर मुख्यमंत्री महोदयांनी नुतनीकृत सभागृहाची, पुस्तके आणि ग्रंथांची पाहणी केली. सदर नुतनीकरणाचे कामकाज  श्रीमती प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता, इलाखा शहर विभाग, मुंबई  यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले आहे.