Breaking News

शाहरुख खान हे भारताच्या व्यक्तिमत्त्व, संस्कृती आणि चारित्र्याचे प्रतिबिंब - राज्यपाल

मुंबई, दि. 26 : शाहरुख खान फक्त त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे लोकप्रिय नाहीत, तर त्यांच्या सार्वजनिक आणि व्यक्तिगत जीवनातील वर्तणुकीमुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. शाहरुख खान यांच्यामध्ये भारताचे व्यक्तिमत्व, संस्कृती आणि चारित्र्य प्रतिबिंबित होते असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले.
टी सुब्बरामी रेड्डी फाऊंडेशन, अनु आणि शशी रंजन यांच्या सहकार्याने देण्यात येणारा राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्कार शनिवारी शाहरुख यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. दहा लाख रुपये रोख, सुवर्णकंकण असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी टी सुब्बरामी रेड्डी, पामेला चोप्रा, ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री रेखा, सिमी गरेवाल, जया प्रदा आणि पद्मिनी कोल्हापूरे, खासदार वेणुगोपाल धूत, अनु रंजन, शशी रंजन आदी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले की, यश चोप्रा यांनी शाहरुख खान यांच्यातील क्षमता खूप आधी ओळखली. शाहरुख खान यांच्या करीयरला आकार देण्याचे श्रेय यश चोप्रा यांना जाते. सर्वोच्च स्थानावर फार काळ टिकून राहणे अवघड गोष्ट असते, मात्र शाहरुख खान यांचा बॉलिवूडवर 25 वर्षांहून अधिक काळ दबदबा राहिलेला आहे.
शाहरुख खान यांनी देशातील शेवटच्या माणसाच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. त्याला संकटांशी धैर्याने आणि आत्मविश्‍वासने लढायला शिकवले.
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. 2020 साली भारतीयांचे सरासरी वय 29 असेल. तरुणांची ही ताकद राष्ट्र उभारणीसाठी आणि सकारात्मक कार्यात वापरायला हवी. स्वछ भारत, बेटी बचाव, कौशल्य विकास असे अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम सरकार राबवित आहे तरुणांनी त्यात सहभागी व्हावे. बॉलिवूडने तरुणांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्यास प्रवृत्त करावे अशी अपेक्षा राज्यपाल श्री. राव यांनी व्यक्त केली.
शाहरुख खान यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मी आज जो कुणी आहे तो यश चोप्रा यांच्यामुळे आहे. यश चोप्रा यांच्यामुळेच माझे करिअर घडले. मी मुंबईत आलो तेव्हा मला कुटुंब नव्हतं पण आज माझं माझे कुटुंब खूप मोठे आहे आणि ते जगभर पसरलंय. यावेळी खान यांनी त्यांचे निर्माते, दिग्दर्शक यांचे आभार मानले.
राष्ट्रीय यश चोप्रा स्मृती पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी हा पुरस्कार लता मंगेशकर, अमिताभ बच्चन तसेच रेखा यांना देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये पामेला चोप्रा, सिमी गरेवाल, बोनी कपूर, जया प्रदा आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा समावेश होता.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकार  उपस्थित होते.