Breaking News

राज्यात सर्व ठिकाणी काँग्रेससोबत आघाडी : शरद पवार

नांदेड, दि. 26 - राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करु, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते नांदेडमध्ये बोलत होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाली आहे. आघाडी झाली तर राज्यातल्या 17 ते 18 जिल्हा परिषदांमध्ये सत्ता येईल. मुंबईत होणार्‍या राष्ट्रवादीच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो, असं पवार म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवडणुकांनंतरचं वर्तन पाहता ते सत्तेतून बाहेर पडतील, असं वाटत नाही. पण बाहेर पडले तर मध्यावधी निवडणुकांना जाण्यासाठी सज्ज आहोत, असंही पवार म्हणाले.
मुंबईत राष्ट्रवादी कुणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कारण राष्ट्रवादीने मुंबईत 9 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही सर्वांचं लक्ष आहे. मात्र भाजपला पाठिंबा देण्याचा प्रश्‍नच नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजप आणि शिवसेनेत दोन जागांचा फरक आहे. पण शिवसेनेने अपक्ष मिळून त्यांचा आकडा वाढवला आहे. मुंबईचा कारभार सुरळीत चालावा एवढीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. शिवसेनेकडून उमेदवारांची जुळवाजुळव केली जाईल, पण वेळ आलीच तर पाठिंबा देण्याबाबत स्थानिक नेते विचार करतील, असे संकेतही शरद पवारांनी दिले.