Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात अनेकांची अनामत रक्कम जप्त

। श्रीगोंदे तालुक्यातील शिवसेनेच्या 17 उमेदवारांसह एकूण 78 पैकी  39 उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त

अहमदनगर, दि. 26 - श्रीगोंदे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटातून 28 उमेदवार उभे होते .त्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि काँग्रेसच्या सर्वच्या सर्व म्हणजे 12 उमेदवार सोडून उरलेल्या 16 उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. पंचायत समितीच्या  एकूण 50 उमेदवारांपैकी 23 अशा एकूण 39 उमेदवारांच्या अनामती जप्त झाल्या असून त्यात शिवसेनेच्या 17 आणि 12 अपक्षांचा समावेश आहे.
पेडगाव गणातील शिवसेनेच्या एकमेव उमेदवार  वैशाली भदे , आढळगाव गणातील अपक्ष उमेदवार अनुराधा ठवाळ आणि हंगेवाडी गणाती अपक्ष उमेदवार अनिल वीर  या तिघांच्या अनामती वाचल्या आहेत. नोटाला पडलेली मते सोडून सर्व उमेदवारांच्या वैध मतांच्या एक अष्टमांशापेक्षा अधिक मते मिळविणा-या उमेदवारांच्या अनामती परत मिळणार असून उमेदवारी माघार घेणा-या सर्व उमेदवारांच्या अनामती परत मिळणार आहेत.
श्रीगोंदे तालुक्यातील एकूण 2 लाख 6 हजार 11 मतदारांपैकी 1 लाख 50 हजार 945   म्हणजे 73.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला  होता. त्यामध्ये भाजपला 66 हजार 883 म्हणजे  45 टक्के ,राष्ट्रवादी  काँग्रेसला 36 हजार 939 म्हणजे 24 टक्के , काँग्रेसला 30 हजार 995 म्हणजे 20 टक्के , शिवसेनेला 7 हजार 472 म्हणजे पांच टक्के व अपक्षांसह इतरांना 7 हजार 180 म्हणजे  पांच टक्के मतदान झाले. नोटाला ( वरील पैकी एकही नाही ) 1476 म्हणजे एक टक्का मते पडली. काँग्रेस व  राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 67 हजार 934  म्हणजे 45 टक्के मते मिळाली. जि.प.च्या काँग्रेस आघाडीला तीन आणि भाजपला तीन जागा मिळाल्या
पंचायत समितीमध्ये भाजपला 68 हजार 267  मते मिळून सात जागा मिळाल्या तर काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला  63 हजार 525 मते मिळून पांच जागा मिळाल्या  सभापतीचे पद खुल्या प्रवर्गासाठी असून, भाजप कोणाला सभापती करणार याची उत्सुकता आहे. नेहमीप्रमाणे सभापती व उपसभापतीची निवड 14 मार्चला आणि जि.प. च्या अध्यक्ष - उपाध्य्क्षाची निवड 21 मार्चला होईल. जि.प.च्या चार समित्यांच्या सभापतींची निवड 21 मार्च नंतर होईल.