Breaking News

संत वचनाने जीवन सुखमय व शांतीमय होवू शकते - हभप कदम महाराज

अहमदनगर, दि. 26 - जगाच्या कल्याणासाठी संतांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, संतांनी जनसामान्यंसाठी केलेले कार्य हे अनमोल असून, त्यांनी केलेल्या कार्याचा वारसा असाच चालू राहिला पाहिजे. संतांनी आपणास सर्वकाही दिले. त्यांनी घालून दिलेल्या वचनाचे पालन केल्यास आपले जीवनही सुखमय व शांतीमय होवू शकते. गुरुजणांविषयी प्रत्येकाने आदर बाळगला पाहिजे. कारण आई-वडिलांप्रमाणेच गुरुजनही भावी पिढी घडविण्यासाठी मोठे कार्य करत असतात. किर्तन, प्रवचनामुळे आपले विचार शुद्ध बनतात. शुद्ध विचारांची समाजाला मोठी गरज आहे. जीवनातील दु:ख संपविण्यासाठी दासबोध, ज्ञानेश्‍वरी, हरिनाम, भागवत कथा आदिंचे वाचन आपल्या जीवनात आनंद देऊन जाते, असे प्रतिपादन ह.भ.प ज्ञानेश्‍वर माऊली कदम यांनी काल्याच्या किर्तनप्रसंगी केले.
महाशिवरात्री निमित्त फुलसौंदर मळा येथे सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी काल्याची दहिहंडी शिवसेना उपनेते अनिल राठोड व ह.भ.प.ज्ञानेश्‍वर माऊली कदम यांच्या हस्ते फोडण्यात आली. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर बँक चेअरमन अशोक कानडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, जि.प.सदस्य संदेश कार्ले, नगरसेविका सुनिता फुलसौंदर, सुवर्णा जाधव, अनिल बोरुडे, गणेश कवडे, दत्ता जाधव, संजय शेंडगे, संभाजी कदम, सुरेश तिवारी, दत्ता मुदगल, विष्णु फुलसौंदर, कारभारी सुपेकर, अनिल साळुंके,जालिंदर बोरुडे, विष्णू म्हस्के, अशोक बाबर, संदेश झोडगे, आदि उपस्थित होते. पुढे बोलताना कदम महाराज म्हणाले, किर्तनाला गर्दी असून उपयोग नाही तर अध्यात्माची आवड असणार्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणातून होणार्या किर्तनातून काहीतरी संदेश जाताना नेला पाहिजे. धार्मिकतेबरोबरच सामाजिकतेची जाणिव महत्वाची आहे. समाजात चाललेल्या अनिष्ठ गोष्टींचा सर्वांनी विचार करुन वाहवाहत चालेल्या पिढीला आवर घालणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे, असेही त्यांनी प्रबोधन केले.