विजयाच्या गंगेत घोड न्हालं....पण!

परवा म्हणजे दि.21 फेब्रूवारीला कमळ फुलतांना अवघा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. दुःख कमळ फुलतांना होणार्या वेदनांचे अजिबात नव्हते.माञ फुलणार्या कमळाच्या पाकळ्या वादळासारख्या घरावरचे छप्परच उध्वस्त करू पाहतील तेव्हा भवरांनी कुणाचा आधार शोधायचा....ही भिती खरेतर चिंता निर्माण करू लागली आहे.
उणेपुरे दोन वर्षाच्या कारभारातच देशभरातील जनता भारतीय जनता पक्षाला विटल्याचे चिञ निर्माण झाले होते.महाराष्ट्रातही भ्रष्टाचार निर्मुलनाच्या मुद्द्यावर जनतेने लोकशाही आघाडीविरूध्द कौल दिला आणि देवेंद्रच्या हाती कारभार सोपविला.माञ इथेही पहिल्या टप्प्यातच घोर निराशा पदरी पडली.सरकार विषयी जनमानसात प्रचंड असंतोष निर्माण होत असतांना दुसर्या बाजूला वेळोवेळी निवडणुकांमध्ये माञ वेगळीच परिस्थिती पहायला मिळत होती.सरकारच्या कारभाराचे लक्तरे तोडून मतदारांच्या वेशीवर टांगण्यात वैधानिक विरोधी पक्ष सपशेल अपयशी ठरले हे एक कारण त्यामागे असू शकते.आपली कूवतच या मंडळींच्या लक्षात आली नाही किंबहुना पराभवाच्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी उसंतच मिळाली नाही.सत्तेत राहून शिवसेना अस्सल विरोधी पक्षाची भुमिका बजावत असली तरी त्यामागची नैतिकता मतदारांच्या पचनी पडत नव्हती.आजवरच्या यशापशाचे हे मुल्यमापन होऊ शकते.माञ कालपरवाच्या दहा मनपा आणि पंचवीस जिल्हा परिषदांच्या निवडणूकीची पार्श्वभुमी वेगळी होती.
या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विदर्भाचा अपवाद वगळता कुठेही भाजपाला अनुकुल वातावरण दिसत नव्हते.अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात दिसत होता,शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही अंशी राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यमान सामर्थ्यात दखलपाञ प्रगती होईल असे भाकीत प्राप्त परिस्थितीवरून वर्तविले जात होते.थोडक्यात अवघा महाराष्ट्र पादाक्रांत करण्यासाठी उधळू पाहणार्या भारतीय जनता पक्षाच्या वारूच्या नाकात वेसण टोचण्याची जबाबदारी या पक्षांवर मतदारांनी सोपविली होतीच.त्याच दिशेने रणनिती तयार होऊन प्रत्यक्ष अंमलही झाला.तरीही भारतीय जनता पक्षाने व्यवस्थेचे धुपाटणे हाती घेऊन विजयाचे तेल गाळून घेतले.असा निकालानंतरचा मतप्रवाह सर्वदूर ऐकायला मिळतो आहे.भाजपाला एव्हढे घवघवीत यश कसे मिळू शकते? काँग्रेस राजवटीत व्यवस्थेला वापरून घेण्याची परंपरा होती,तिच किंबहूना त्याही पेक्षाखालच्या पातळीवर जाऊन हे यश संपादन केले का? असे प्रश्न जनमानसाला भेडसावत आहेत.या प्रश्नांची दखल घेऊ या ऊद्या. (क्रमशः)